इंदापूर : इंदापूरला आल्यानंतर अतिशय चांगले घोडे पहायला मिळाले, हा खरा घोडेबाजार आहे. आमच्या राजकारणात वेगळाच घोडेबाजार झाला. आम्ही त्या घोडेबाजाराच्या पाठीशी गेलो नाही, मजबूत विरोधी पक्षात बसलोय. ज्यांनी घोडे बाजार केलाय ते फार काळ सत्तेत बसतील असे वाटत नाही. त्यांचा फुगा फुटणार आहे आणि लवकरच आपणाला परिवर्तन दिसेल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
इंदापूर येथे कृषी महोत्सवाचा समारोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहराव मोहीते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दौंड चे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत दि.१२ रोजी इंदापूरमध्ये पार पडला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘डाॅग शो’ व ‘घोडे चाल’ या स्पर्धां अगदी जवळून पाहिल्या. यावेळी सांगता सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
तर ठाकरे सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना वेळ कसा मिळेल जर भांडण संपली तर वेळ मिळेल. आता घरांची भांडणं असतील, दालणांची भांडणं असतील. पालकमंत्र्याची भांडणं असतील ती भांडणं पुढील सहा आठ महिन्यात संपली की कदाचित ते शेतकऱ्यांकडे वळून पाहू शकतील तोपर्यंत तरी अशा प्रकारची अपेक्षा करणे मला योग्य वाटत नाही. असं म्हणतं फडणवीसांनी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.