कोल्हापूर ९ ऑगस्ट २०२२ : राज्यातील साखर कारखाने सर्रास शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारत आहेत आणि त्यातून उत्पादित झालेली साखर चोरी करून विकत आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे गोडाऊन तपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आणि शासनाचा बुडणारा महसूल अशा दुहेरी फसवणुकीची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूरच्या जीएसटी उपयुक्त वैशाली काशीद यांच्याकडे केली.
राज्यातील अनेक साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसाच्या वजनाच्या दहा टक्के इतकी काटामारी करत आहेत.मोठ्या प्रमाणावर काटा मारीतून तयार होणाऱ्या साखरेची परस्पर विक्री करत आहेत. त्यामुळे तातडीने कारखान्याच्या गोडाऊन वर धाडी टाकून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व काटामारीतून उत्पादित झालेली साखर चोरी करून होत असलेली विक्री व त्यावरील जीएसटी बुडवून शासनाची होणारी फसवणूक या दोन्हींवर जरब बसेल.
महाराष्ट्रात गेल्यावर्षी १३ कोटी २० लाख टन इतक्या उसाचे उत्पादन झाले. त्याच्या १० टक्के म्हणजे १ कोटी ३२ लाख टन उसाची चोरी झाली. त्यापासून उत्पादीत झालेली १४.७८ लाख टन साखर विना जीएसटी विकली गेली. त्यामुळे २२९ कोटी रूपयांचा जीएसटी कर बुडवला गेला. कोल्हापूर विभागाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २ कोटी ५५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २५ लाख ५० हजार टन उस काटामारीतून चोरला गेला.
त्यापासून तयार झालेली ३ लाख १६ हजार टन साखर चोरून विकली गेली. यामधून ४८.९० कोटी रूपयांचा जीएसटी बुडाला. ऊसात काटामारी करून राज्यात सरासरी ४५८१ कोटींचा दरोडा टाकला जात आहे. चोरीच्या साखरेची विक्री बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, किरकोळ व्यापारी यांच्यामार्फत चोरून विक्री केली जाते. यातील थेट पैसा चोरांच्या घशात जात आहे. त्यामुळे याची तपासणी केली जावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर