राज्याचे मुख्यमंत्री हे बिनखात्याचे मंत्री: चंद्रकांत पाटील

34

बारामती : राज्याचे मुख्यमंत्री बिन खात्याचे मंत्री आहेत. सत्तेत शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्री पदासह १५ मंत्रीपदे आली. त्यातील दोन त्यांनी घरातच ठेवली. तीन अपक्षांना दिली. मग १० मंत्र्यांच्या बळावर सेना आपल्या शिवसैनिकांना कसे बळ देणार? सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. सेनेसाठी भाजपची कवाडे खुली असतील, असेही ते म्हणाले. राज्याच्या एकूण बजेटच्या ७५ टक्के बजेट असणारी खाती राष्ट्रवादीने बळकावली आहेत. मलईदार खाती पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरु असून त्यामुळे तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कुरबुरी सुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.
पाटील यांनी शनिवारी (दि.४) बारामतीतील भाजप संपर्क कार्यालयामध्ये पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, कुलभूषण कोकरे, पृथ्वीराज जाचक, सुनील पोटे, नितीन भामे, सतीश फाळके, सुरेंद्र जेवरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी शिवसेनेला जोरदार चिमटे काढले. हिंदूत्ववादी भूमिका आता शिवसेनेने सोडून दिली आहे. त्यामुळे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणारे ते आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे म्हणायला लागले आहेत. सुरुवातीला महाशिवआघाडी होती. ती आता महाविकास आघाडी झाली. राहूल गांधींनी सावरकरांचा अपमान केला. त्याविषयी शिवसेना काही बोलायला तयार नाही. मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाने प्रकाशित पुस्तकात सावकर व गोडसेंबद्दल विकृत लिखाण करण्यात आले आहे. त्यावर सेना बोलायला तयार नाही. सावकरांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री भेटू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावर शिवसेना बोलू शकत नाही. कारण केंद्राने घेतलेला निर्णय त्यांना पटतोय. लोकसभेत ते पाठींबा देतात, परंतु सोनिया गांधी यांनी आम्ही बाहेर पडू, असा दम दिल्यामुळे राज्यसभेत त्यांनी तटस्थेचे धोरण स्विकारले. आता काँग्रेससोबत या कायद्याविरोधात रस्त्यावरील आंदोलनात सहभागी व्हा, असा सोनियांचा शिवसेनेला आग्रह आहे. सेना आता खरेच काॅंग्रेसबरोबर रस्त्यावर उतरते का ते पाहू, असे पाटील म्हणाले.
राज्यातील सरकार देवाच्या भरोशावर सुरु आहे. कोणत्याही खात्याला मंत्री नाहीत. दोन महिन्यांपासून हा गोंधळ सुरु आहे. घटनेनुसार किमान १२ लोकांचे मंत्रीमंडळ असायला हवे. त्यांनी सात जणांना शपथ दिली. त्यामुळे त्यांनी महिनाभरात घेतलेले निर्णय घटनाबाह्य ठरतात, असे सांगून पाटील म्हणाले, शपथा घेतल्या परंतु खातेवाटप नाही. मलईदार खात्यासाठी भांडणे सुरु आहेत. त्यांचे वाद त्यांना लखलाभ परंतु जनता त्यात भरडली जातील.

ही तर फसवी कर्जमाफी

राज्य शासनाने केलेली कर्जमाफी पूर्णतः फसवी आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देणार होता, त्याचे काय झाले, असा सवाल करून पाटील म्हणाले, आमच्या सरकारने शेतकऱ्याचे पीककर्ज माफ केले आहे. आता हे सरकार कसले कर्ज माफ करणार? २००१ ते २०१६ या १६ वर्षाचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज आम्ही माफ केले. आता कर्जमाफीसाठी कोणी उरलेले नाही. ऊस उत्पादक थकबाकीत नसतो. ऊस गेला की सोसायटी त्याचे पैसे कापते. त्यामुळे ही फसवेगिरी आहे.

हिम्मत असेल तर वेगवेगळे लढा

भाजपला रोखायचा एवढाच एक कलमी कार्यक्रम सत्तेतील तिन्ही पक्षाकडून सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषद-पंचायत समितीत ते महाविकास आघाडीचा प्रयोग करत आहेत. भाजपबद्दलच्या रागातून ते एकत्र आले आहेत. याचे कारण गेल्या पाच वर्षात ते एकही निवडणूक जिंकू शकले नाहीत. भाजपबद्दलचा राग हाच त्यांच्या एकत्र येण्याचा काॅमन फॅक्टर आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सेनेचे १० पैकी सात सदस्य मागील वेळी आमच्यासोबत होते. यंदा सेनेचे मुख्यमंत्री असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना भागो असा संदेश दिला. ते गेले. कोल्हापूरसाठी हा काही नवीन प्रयोग नाही. तेथे महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक या ठिकाणी यापूर्वी असे प्रयोग झालेले आहेत. आम्हाला हरविण्यासाठी राज्यभर या तीन पक्षांना एकत्र यावे लागते. हिम्मत असेल तर वेगवेगळे लढा. एकत्र आल्यावर ताकद वाढणारच. निवडणूकीनंतरची त्यांची युती आहे. निवडणूक पूर्व युती करून त्यांनी निवडणूकांना सामोरे जावे, मग बघू.. असेही पाटील म्हणाले.

साखर कारखान्यांचे फुंकले रणसिंग
बारामती तालुक्यातील माळेगाव व सोमेश्वरसह लगतच्या छत्रपती कारखान्याची निवडणूक भाजप लढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. भाजप जिथे डिपाॅझिट जाते. ती निवडणूकही ताकदीने लढते. या तिन्ही कारखान्यांच्या निवडणूका आम्ही लढणार. माळेगाववर भाजपची सत्ता आहे. छत्रपतीमध्ये गतवेळी थोड्या मताने पराभव झाला. सोमेश्वरला फरक जादा होता. परंतु तेथेही यंदा आम्ही लढणार. सत्ताधारी मंडळी महाविकास आघाडीचा प्रयोग तेथेही करत आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करणार. कारखान्यांतील महाविकास आघाडी एखाद्यावेळी यशस्वी होवू शकते, कारण ती बांधिल असते. विधानसभा, लोकसभेला ते एकत्र आल्यावर लोक त्यांना मतदान करतात की आम्हाला हे मला बघायचेय, असे पाटील म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा