मुंबई, दि. ८ जून २०२०: राज्यात २४ मार्च पासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मद्यविक्रीचा देखील समावेश होता. महसुलात होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विक्रीस परवानगी दिली होती. मात्र यानंतर दुकानांवर प्रचंड प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली होती त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ऑनलाइन विक्रीसाठी परवानगी दिली होती. त्यानंतर १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे.
यादरम्यान १५ मे पासून ते ७ जून या काळामध्ये १० लाख ७८ हजार १२१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. काल दिवसभरात ६८ हजार ४४२ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३९ हजार ४७३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
राज्यात मद्य विक्रीसाठी अटींसह परवानगीही दिल्यानंतर राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री परवान्यांपैकी ७,७१० परवाने सुरू आहेत. राज्य शासनाने ३ मे, २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात दि.१५/५/२०२० पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. १ मे ते ३१ मे २०२० या काळात १ लाख २० हजार ५४७ ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख १० हजार ७६३ ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी