राज्यातील चहा विक्रेत्यांवर राहणार एफडीएची नजर

मुंबई : पुण्यातील येवले चहामध्ये भेसळ असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहवालातून स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील चहाविक्रेत्यांवर एफडीएने आपली करडी नजर ठेवण्याचे ठरवले आहे.
चहाविक्रेत्यांची पाहणी करण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे मुंबईतील चहाविक्रेत्यांवर कधीही धाड पडू शकते, असा इशारा एफडीएकडून देण्यात आला आहे.

येवले अमृततुल्यकडून चहामध्ये मेलामाईन नावाचा घातक पदार्थ वापरण्यात येत असल्याचे सांगत एफडीएकडून कारवाई करण्यात आली होती. यावेळी प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवलेल्या चहाच्या नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये येवले चहाप्रमाणे सुरू करण्यात आलेल्या चहा स्टॉल, चहा विक्रेते यांच्यावर धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील १३ झोनमधील अधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चहा पावडरमध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ‘धनश्री’चे तब्बल ५१० किलो वजनाचा ८९ हजार ७६० किमतीचे उत्पादन जप्त करण्यात आले.
या चहा पावडरमध्ये दोन प्रकारचे रंग वापरण्यात आले असून, त्याचे प्रमाण अधिक असल्याचा संशय वर्तवत चहा पावडर जप्त केली असल्याची माहिती एफडीएचे मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा