PMP चा खास उपक्रम पैठणी जिंका, महिलांनो पीएमपीतून प्रवास करा!

PMP’s special offer – राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMP) महिला प्रवाशांसाठी एक विशेष उपक्रम जाहीर केला आहे. येत्या शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून सुंदर पैठणी आणि एक महिन्याचा मोफत बस पास जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात दररोज सुमारे ४ ते ५ लाख महिला प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी ९ ऑगस्ट रोजी पीएमपी बसने प्रवास करून तिकीट घ्यावे लागेल. तिकीट, दैनंदिन पास किंवा मोबाइल ॲपवरून घेतलेले तिकीट यासाठी ग्राह्य धरले जाईल. सहभाग नोंदवण्यासाठी बसमधील क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरता येईल. स्मार्टफोन नसलेल्या महिलांसाठी वाहकांकडून कुपन देण्यात येईल, जे भरून बसमधील बॉक्समध्ये टाकायचे आहे.

संगणकीकृत सोडत पद्धतीने एकूण १७ महिला विजेत्यांची निवड होईल. विजेत्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील. हा उपक्रम पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांची संकल्पना असून, महिला प्रवाशांना आनंददायी अनुभव देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे