नवी दिल्ली : राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वांनी ११ रुपये व एक वीट द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. झारखंडमधील निवडणूकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. यावेळी आदित्यनाथ यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरूनही काँग्रेसवर हल्लाबोल केला.
योगी आदित्यनाथ म्हणाले, मी उत्तर प्रदेशमधून आलो आहे. जी प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. त्यांच्या शासन प्रणालीला रामराज्य म्हटले जायचे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांना न्याय दिला. तेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील करत आहेत.
पंतप्रधान यांच्या प्रयत्नांमुळे ५०० वर्षे जुना वाद संपुष्टात आला आहे. लवकरच अयोध्येत एका भव्य मंदिर उभे राहणार असून, त्यासाठी झारखंडवासियांनी ११ रुपये व एक वीट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिर लवक उभारण्यासाठी एक समिती स्थापन करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.