उस्मानाबाद, दि. २९ जून २०२०: उस्मानाबाद सह वाशीम, गडचिरोली, आणि नंदूरबार या आकांक्षित जिल्ह्यांत प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान राबविण्याबाबत आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या या लॉकडाउन मुळे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या औद्योगिक पट्टयातून विशेषतः मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात मजुरांनी वापसी स्थलांतर केल्याने त्यांच्या रोजगाराचा तसेच चरितार्थाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीनुसार, अकुशल, अर्धकुशल व कुशल स्वरूपाचा रोजगार, उत्पन्न व निर्वाह उपलब्ध करून देण्यासाठी या चार आकांक्षित जिल्ह्यांत प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान राबवा अशी मागणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केल्याचे आज दिनांक २९ जून रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून सांगितले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या माध्यमातून गाव ते मुख्य रस्ता जोडणारे बारमाही रस्ते तयार करणे, महिला मंडळांना सभागृह, सार्वजनिक तलाव, प्राथमिक शाळांची सुविधायुक्त इमारत, पेयजल योजना आदी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत सुविधा व मत्ता जसे निर्माण होणार असून कामगारांचा निर्वाह व या भागात रचनात्मक विकास अशा दोन्ही बाबी साध्य होऊन ग्रामीण जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत होणार असल्याने या अभियानात उस्मानाबाद, वाशीम, गडचिरोली, आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत आपण केंद्राकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिल्याचे आ.राणा जगजीतसिंह पाटील यांनी आज दिनांक २९ जून रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून सांगितले.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड