येस बँक घोटाळा प्रकरणी राणा कपूर यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर २०२२ : येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. ‘ईडी’ने ४६६.५१ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक केली होती. राणा कपूर यांना ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत ही अटक करण्यात आली होती. आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

येस बँकेशी संबंधित घोटाळ्यामुळे बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली होती. याप्रकरणी ‘सीबीआय’ने राणा कपूर आणि ‘अवंता ग्रुप’चे प्रमोटर गौतम थापर यांच्यावर ४६६.५१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.

ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात ६०० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. ही रक्कम ‘डीएचएफएल’सारख्या कर्ज बुडविणाऱ्या कंपनीकडून देण्यात आली होती.

दरम्यान, याआधी राणा कपूर यांना दिल्लीतील एका मालमत्तेच्या विक्रीसंबंधित फसवणुकीच्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर झाला होता. आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर झाल्यामुळे तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा