गोल पोस्ट महाराष्ट्र स्मारकाच्या शुद्धीकरणावरून रणेंच शिवसेनेला प्रत्युत्तर, “स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा”

स्मारकाच्या शुद्धीकरणावरून रणेंच शिवसेनेला प्रत्युत्तर, “स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा”

मुंबई, २१ ऑगस्ट २०२१: भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. आता यापर आपली पहिली प्रतिक्रिया देत नारायण राणे यांनी  या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय.
नारायण राणे यांनी याविषयी आपल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. “मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावं, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. ह्या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का?”
ते पुढे म्हणाले, “मला कोणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचं शिंपडू द्या, कोणाला प्यायचं त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडलं? काय दूषित झालं होतं?”
स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा
“एवढाच जर स्मारकाबद्दल आदर आहे, तर ते ज्या स्थितीत आहे, त्याकडे लक्ष द्या. पँट वर करून दलदलीतून तिकडे जावं लागतं. मी अनेक स्मारकं पाहिली आहेत, त्याच्या आजूबाजूला सुंदर लॉन असतं, सुशोभीकरण केलेलं असतं. झाडं आहेत. इथे काय आहे? साहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले ना, त्यांनी ते स्मारक जागतिक किर्तीचं कसं होईल याकडेही पाहावं, हेच माझं त्यांना उत्तर आहे. स्मारकाचं शुद्धिकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा”.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
error: Content is protected !!
Exit mobile version