रंजन तावरे व नंदकुमार खैरे यांच्यावर अपहाराचा गुन्हा

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे प्रमुख रंजनकुमार शंकरराव तावरे यांनी पतसंस्थेतेचे सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्या संगनमताने ५१ लाख ३० हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

त्या प्रकरणी माळेगाव कारखान्याचे संचालक व पतसंस्थेचे सभासद सुरेश तुकाराम खलाटे (रा.कांबळेश्वर) यांनी तावरे व खैरे यांच्याविरुद्ध शनिवार (दि.१८) रोजी उशिरा पोलिसात फिर्याद दिली. सन २०११ साली पतसंस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे व सचिव नंदकुमार खैरे यांनी संगनमत करून माझ्यासह रामदास आटोळे (खांडज), राजेंद्र सखाराम बुरूंगले (माळेगाव बुद्रूक) आम्हा तिघांच्या कोऱ्या कर्ज मागणी प्रकरण, धनादेशावर सह्या घेतल्या व आमच्या नावे प्रत्येकी १७ लाख १० हजार रुपये असे एकूण ५१ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखविले. तसेच सदर रक्कम बेरर चेकद्वारे आमच्या परस्पर काढून घेतली, अशी तक्रार खलाटे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
उपलब्ध फिर्याद व सहाय्यक निबंधकांच्या चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी शरद संस्थेचे अध्यक्ष तावरे व सचिव  खैरेंच्या विरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, रक्कमेचा अपहार करणे, विश्वासघात करणे, तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रमोद पोरे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी खलाटे, आटोळे, बुरुंगले व संशयीत आरोपी तावरे हे एकमेकांचे २० वर्षांपासूनचे खंद्दे समर्थक होते.
परंतु मार्च २०१९ मध्ये शरद संस्थेतून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच खलाटे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा केला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा