बिहार, ३ ऑक्टोंबर २०२०: बलात्काराच्या प्रकरणांवरून सध्या पूर्ण देशात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश मधील हाथरस प्रकरणामुळं सध्या देशात संतापाची लाट उसळली आहे. देशात सरासरीनुसार रोज ८० पेक्षा जास्त बलात्कार होतात. यातील किती घटना माध्यमांपर्यंत पोहोचतात हे लक्षात येतंच. याहीपेक्षा घातक म्हणजे या घटनांचा निकाल व दोषींवर कारवाई होण्यास सातत्यानं दिरंगाई होताना दिसत आहे. या सर्वांमध्येच बिहारमधील गया येथे एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. यानंतर या अल्पवयीनं मुलीनेे गळफास लावून आत्महत्या केली.
वास्तविक, ही घटना गया येथील कोंच पोलीस स्टेशनच्या गरारी बलवापर भागातील आहे. येथे काही नराधमांनी एका दलित अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी सदर प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये तीन ज्ञात आरोपींवर आणि एक नीनामी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार पीडितेच्या कुटुंबीयांनी गरारी येथील काही आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. निवेदनात कुटुंबियांनी असं म्हटलं आहे की, अल्पवयीन मुलगी गावातीलच एका घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. आरोपींनी अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून एका निर्जन जागेत नेले व रात्रभर सामूहिक बलात्कार केला.
तर दुसरीकडं पीडितेचे कुटुंबीय रात्रभर तिचा शोध घेत राहिले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित युवती रडत रडत घरी आली. मुलीनं आतील खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळं घरच्यांना संशय आला. त्यामुळं त्यांनी दरवाजा उघडून आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडल्यानंतर त्यांना पीडित मुलगी फासावर लटकलेला दिसली.
फासावरून तिला खाली उतरवताच तिला जवळील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून तिला पटन्यामध्ये स्थलांतरित करण्यास सांगितलं. पटन्यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी कुटुंबीयांची जबानी घेतली आहे व पुढील तपास सुरू केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे