अंबाला, २९ जुलै २०२०: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आज ५ राफेल विमानांची तुकडी दाखल झाली आहे. त्यामुळे भारतीय वायू सेनेची ताकद आणखीन वाढली आहे. फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर पाच राफेल लढाऊ विमान भारतीय हद्दीत दाखल झाले. बुधवारी हरियाणाच्या अंबाला एअरबेसवर राफेल विमान दाखल झाले, तेथे त्यांचे स्वागत पारंपरिक जलदानाने करण्यात आले. यावेळी हवाई दलाचे प्रमुख आर के एस भदौरिया देखील उपस्थित होते. फ्रान्समधून प्राप्त होणारी राफेल विमानांची ही पहिली खेप आहे. ही विमाने मंगळवारी फ्रान्सहून रवाना झाली, त्यानंतर ते युएईमध्ये थांबले आणि बुधवारी दुपारी अंबाला येथे पोहोचले.
भारताने फ्रान्स कडून ३६ विमानांची मागणी केली होती त्या अंतर्गत ही ५ विमाने आज भारताला सोपवण्यात आली आहेत. उर्वरित विमाने दोन वर्षात टप्प्या टप्प्याने देण्यात येणार आहे. दरम्यान अंबाला एअरफोर्स स्टेशनवर मोठ्या संख्येने लोक जमा होतील म्हणून कलम १४४ लागू केले गेले आहे आणि तेथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हा भाग कालपासून ड्रोन फ्री म्हणून घोषित केला गेला होता.
तथापि २०२१ डिसेंबरपर्यंत सर्व ३६ राफेल विमान फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी, राफेल विमाने फ्रान्सच्या मरीनॅक एअरबेसवरून भारतात रवाना झाली होती. यावेळी फ्रान्समध्ये भारताचे राजदूत जावेद अशरफ हे देखील एअरबेसवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी