पुणे ६ फेब्रुवारी२०२५ : पुणे शहराच्या विकासासोबतच वाढणारी वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पुणे मेट्रोने कंबर कसली आहे. शहराच्या विविध भागांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम वेगाने सुरू आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामुळे पुणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
खराडी ते विमानतळ मेट्रो मार्ग: पूर्व पुण्याला मोठी कनेक्टिव्हिटी
खराडी आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा मेट्रो मार्ग लवकरच कार्यान्वित होणार आहे. पुणे महानगरपालिकेला या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी असा विस्तारित करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व पुण्यातील नागरिकांना विमानतळावर पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
खराडी: इंटरचेंजेबल आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब
खराडी परिसरात इंटरचेंजेबल आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे प्रवाशांना विविध प्रकारच्या वाहतूक साधनांचा वापर करून विमानतळावर पोहोचता येणार आहे. चांदणी चौक, वाघोली, स्वारगेट, हिंजवडी आणि शिवाजीनगर या भागांतील प्रवाशांना याचा विशेष फायदा होईल.
कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्ग: पुणे आणि पिंपरी-चिंचवडची कनेक्टिव्हिटी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास पुणे मेट्रोचे एक वर्तुळाकार जाळे तयार होईल, ज्यामुळे प्रवासाला अधिक सोयीचे होईल.
वनाज ते चांदणी चौक: दुमजली मेट्रो आणि उड्डाणपूल
वनाज ते चांदणी चौक या मार्गावर दुमजली मेट्रो आणि उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता आहे. नळस्टॉप येथील यशस्वी प्रयोगानंतर या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.
पुणे मेट्रोच्या या विस्ताराच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच, प्रवासासाठी अधिक चांगले आणि जलद पर्याय उपलब्ध होतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी ;सोनाली तांबे