चंद्रपुरात आढळली दुर्मिळ पांढरी हरणे; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

चंद्रपूर, १० मार्च २०२३ : आपण आतापर्यंत तपकिरी ठिपके असलेले हरीण बघितले आहे; पण आता पांढऱ्या रंगाचेही हरीण पाहायला मिळाले तर आपणाला आश्चर्य वाटायला नको. चंद्रपूर जिल्ह्यात आता पांढऱ्या रंगाचेही हरीण पाहायला मिळणार आहेत. देशात अतिशय दुर्मिळ असलेले पांढऱ्या रंगाची ३ हरणे (२ मोठे, एक लहान) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णाच्या (केमारा देवई) पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात नुकतेच आढळून आले आहेत.

बल्लरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पवन भगत आणि बल्लरपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कळसकर हे केमरा देवई गावावरून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून सहपरिवार परत येत असताना त्यांना केमरा देवई वनक्षेत्रात पांढऱ्या रंगाची अतिशय दुर्मिळ ३ हरणे आढळून आली. त्यांनी लगेच हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. याची माहिती त्यानी सोशल मीडियावर शेअर केली. पांढऱ्या हरणांविषयी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

पोंभुर्णा वनपरिक्षेत्र सात हजार एकरमध्ये विस्तारलेला आहे. आठ महिन्यांपासून येथे आम्ही कार्यरत आहोत. वाघ, बिबट्या, नीलगाय, हरीण, रानगवे असे अनेक प्राणी या वनक्षेत्रात बघतिले; पण पांढरे हरीण बघितले नाही; परंतु नुकतेच पांढरे हरीण काही जणांना पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या हरणांना पाहण्याची उत्सुकता आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार व कोठारी येथील वन अधिकारी मुरकुटे यांनी दिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा