Ration Card Verification Campaign 2025 Pune: राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आता शिधापत्रिकांच्या पडताळणीची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे तुमच्या निवासस्थानाचा ठोस पुरावा नसेल, तर तुमची शिधापत्रिका रद्द होऊ शकते! ही पडताळणी मोहीम येत्या १ एप्रिलपासून सुरू झाली असून ती ३१ मे पर्यंत चालणार आहे.
या मोहिमेअंतर्गत केशरी, अंत्योदय आणि शुभ्र शिधापत्रिकांची कसून तपासणी केली जाणार आहे. सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की, जे लाभार्थी यासाठी पात्र नाहीत, त्यांना शोधून काढले जाईल. त्यामुळे आता प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आपल्या रहिवासाचा पुरावा सादर करणे अनिवार्य असणार आहे.
दोन महिने चालणार तपासणी, अपात्र लाभार्थी येणार समोर.
या पडताळणी प्रक्रियेदरम्यान, शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या राहत्या ठिकाणाचा पुरावा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. जर या वेळेत पुरावा सादर करण्यात अयशस्वी ठरले, तर त्यांची शिधापत्रिका तात्काळ रद्द केली जाईल, असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत. इतकेच नव्हे, तर एकाच पत्त्यावर जर दोन शिधापत्रिका आढळल्या, तर त्याही रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय सादर करायचे पुरावे?
रहिवासाचा पुरावा म्हणून शिधापत्रिकाधारकांना अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात भाडेपावती, घराच्या मालकीचा कागदपत्र, गॅस कनेक्शनची पावती, बँकेचे पासबुक, वीज बिल, टेलिफोन किंवा मोबाईल बिल, वाहन परवाना, कार्यालयाचे किंवा कोणतेही अधिकृत ओळखपत्र, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा सादर करता येईल. विशेष म्हणजे, कोणत्याही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
अर्जांची होणार काटेकोर तपासणी!
या पडताळणीसाठी, सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडे अर्ज उपलब्ध असतील. शिधापत्रिकाधारकांनी हा अर्ज भरून त्यावर हमीपत्र द्यायचे आहे आणि सोबत रहिवासाचा योग्य पुरावा जोडायचा आहे. दुकानदारांनी हे अर्ज भरून संबंधित कार्यालयात जमा करायचे आहेत. त्यानंतर, क्षेत्रीय अधिकारी या अर्जांची कसून तपासणी करतील. ज्यांनी पुरावे सादर केले आहेत त्यांची वेगळी यादी तयार केली जाईल आणि ज्यांनी दिलेले नाहीत त्यांची वेगळी यादी तयार केली जाईल. त्यामुळे, आता सर्व शिधापत्रिकाधारकांनी सतर्क राहून आपल्या रहिवासाचा पुरावा तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे!
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे