रेशन दुकानदारांची दिवाळीनंतरही ‘कमिशन कोंडी’ कायम आर्थिक संकटात!

राज्यभरातील रेशन दुकानदारांना गेल्या पाच महिन्यांपासून कमिशन न मिळाल्याने दिवाळीनंतरही त्यांची आर्थिक कोंडी कायम आहे. त्यामुळे दुकानदारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली असून, पुणे जिल्ह्यातील २,६१४ दुकानदारांना या समस्येचा थेट फटका बसला आहे.

यामध्ये पुणे शहरातील ७५५ आणि पिंपरी-चिंचवडमधील २५३ दुकानदारांचा समावेश आहे. रेशन दुकानदारांचा संपूर्ण उदरनिर्वाह या कमिशनवर अवलंबून असतो. १०० किलो धान्य विक्रीवर मिळणारे कमिशन २० ऑगस्टपासून १५० रुपयांवरून वाढवून १७० रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे, मात्र ही वाढ कागदावरच राहिली कारण गेल्या पाच महिन्यांपासून कमिशनच मिळाले नाही. यामुळे दुकानदारांमध्ये प्रचंड नाराजी वाढली असून, ‘आम्हाला राज्यात आता कोणी वाली उरला नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील दुकानदार चिंतामणी सोडकर सांगतात की, कमिशन थकीत असल्याने वीजबिल, दुकानभाडे, इंटरनेट आणि मदतनीसांचा पगार देणे कठीण झाले आहे. ऑल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी सरकारकडे थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी केली आहे.

पुरवठा अधिकारी प्रशांत खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून-जुलैचे कमिशन वाटप झाले असून, ऑगस्टनंतरच्या कमिशनचे वाटप या आठवड्यात होईल. मात्र, संघटनांचे अध्यक्ष शंकरराव अतकरे यांनी सरकारने दर महिन्याला कमिशन जमा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. कमिशनच्या थकबाकीमुळे रेशन दुकानदारांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे