Ration Shopkeepers Appeal for Commission Hike: राज्यातील तब्बल ५२ हजार रेशन दुकानदारांना निवडणुकीपूर्वी दिलेले कमिशन वाढीचे आश्वासन अखेर पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. या मागणीसाठी आणि इतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांसाठी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करून न्याय मिळवून देण्याची आर्त हाक दुकानदारांनी दिली आहे.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे आणि रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बनसोडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. संघटनेचे विजय गुप्ता आणि पुणे अध्यक्ष गणेश डांगी यांच्यासह रमेश शर्मा, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष अशोक पाटील आणि इतर अनेक प्रमुख सदस्य या वेळी उपस्थित होते.
निवेदनात दुकानदारांनी २०१७ पासून मिळत असलेले प्रतिक्विंटल केवळ १५० रुपये कमिशन महागाईच्या तुलनेत अत्यंत अपुरे असल्याचे स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कमिशन वाढीची मागणी आता पूर्ण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केवळ कमिशनच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात ठेकेदारांमार्फत धान्याचा पुरवठा वेळेवर होत नसल्याची गंभीर समस्याही दुकानदारांनी मांडली.
यासोबतच, काही दुकानदारांना महिन्याच्या अखेरीस धान्य मिळत असल्याने शेवटच्या दोन-तीन दिवसांत त्याचे वाटप करणे अत्यंत जिकिरीचे ठरते. यामुळे अनेक गरीब कार्डधारक धान्यापासून वंचित राहतात. त्यामुळे, ज्या दुकानदारांना उशिरा धान्य मिळते, त्यांना धान्याचे वाटप करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी महत्त्वाची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दुकानदारांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, लवकरच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे, वर्षानुवर्षे आपल्या हक्काच्या कमिशनसाठी आणि इतर अडचणींसाठी संघर्ष करणाऱ्या राज्यातील रेशन दुकानदारांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महायुती सरकार निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे
