मुंबई, 5 ऑक्टोंबर 2021: लखमीपूर मध्ये घडलेल्या घटनेनंतर पूर्ण देशभरातून विरोधक संतापले आहेत. या घटनेनंतर सर्व विरोधी पक्ष भाजप वर हल्ला करताना दिसत आहे. चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यानंतर शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. यानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केलीय. आज उत्तर प्रदेशमध्ये जे सुरु आहे त्याविरोधात कोणी काही बोलणार आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत सध्या शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपाचं अधिकृत धोरण आहे का?, असं राऊत य़ांनी सत्ताधाऱ्यांना विचारलं आहे. इतकच नाही तर राऊत यांनी मोदी सरकारची तुलना ब्रिटीश राजवटीशी करताना क्रांतीकारक बाबू गेनू यांचाही उल्लेख केलाय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी विचारलं की, शेतकऱ्यांना चिरडणं आणि त्यांच्या समर्थनात आलेल्या विरोधी नेत्यांचा आवाज दाबणं ही भाजपची नवीन रणनीती आहे का? एका दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाले होते. राऊत म्हणाले की, जेव्हा मुंबईच्या साकीनाकामध्ये (गेल्या महिन्यात) बलात्काराची घटना घडली तेव्हा भाजपने गोंधळ घातला आणि “आम्ही (राज्य सरकारने) कोणालाही गुन्हेगारीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखलं नाही.”
त्यांनी विचारलं, “कथितपणे एका मंत्र्याच्या मुलाच्या गाडीनं (लखीमपूर खेरीमध्ये) शेतकऱ्यांना चिरडलं गेलंय. अशी क्रूरता कुठून येते? “
विरोधकांचा आवाज दाबणं भाजपची नवीन रणनीती
राऊत म्हणाले की, (उत्तर प्रदेशातील भाजप सरकार) काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आणि इतर नेत्यांना केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणाऱ्या विरोधक शेतकऱ्यांशी एकता दाखवण्यासाठी लखीमपूर खेरीला जाण्यापासून रोखण्यात आलंय. राऊत म्हणाले, “शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप विरोधात एकता दाखवणाऱ्या विरोधी नेत्यांचा आवाज दाबण्याची भाजपची नवीन रणनीती आहे का?”
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात ही क्रूर वागणूक का दिली जात आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का?, असा प्रश्नही राऊतांनी विचारलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे