कत्तलखान्यात घेऊन जाण्याच्या उद्देशाने दोन जर्सी गायींची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींविरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी किवळे येथील समीर लॉन्सजवळ करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश कदम यांनी फिर्याद दिली असून, प्रसाद गजानन जाधव (रा. रहाटणी) आणि बाळा पवार (रा. चांदखेड, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी जनावरांना दाटीवाटीने कोंडून त्यांची अमानुषपणे वाहतूक करत होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सध्या या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी रावेत पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे प्राण्यांच्या क्रूरतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































