रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद केंद्रीय पातळीवर पोहोचला

रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांचा वाद अधिकच पेटताना दिसतो आहे. माजी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महायुतीत बिघाड होऊ नये असे सांगितले, परंतु रवींद्र धंगेकर यांनी आता थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जैन बोर्डिंग प्रकरणी चौकशी आणि मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा मागितला आहे. तसेच, ते २७ ऑक्टोबर २०२५ पासून जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

पत्रात काय म्हटले आहे?

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहाराची निपक्षपाती चौकशी व्हावी. त्यांनी सांगितले की, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानाच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी. ही चौकशी मुरलीधर मोहोळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा झाल्यानंतरच शक्य आहे, कारण या प्रकरणातील गैरव्यवहार त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखाली घडला आहे.

२७ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन

धंगेकरांनी पुढे लिहिले आहे की, “तमाम पुणेकरांना मी माहिती देतो की जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे. तसेच, २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसणार आहे.

मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागितला

“गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात अनेक पुरावे दर्शवतात की व्यवहारातील सर्व व्यक्ती व संस्था मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे मी या पत्रात देखील मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा मागितला आहे,” असे धंगेकरांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्राची प्रत

धंगेकरांनी आपल्या पत्राची प्रत प्रधानमंत्री, गृह मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवली आहे. त्यांनी प्रकरणाकडे लक्ष देऊन हा व्यवहार तातडीने रद्द करावा आणि मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा होईपर्यंत कठोर चौकशी व्हावी, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील