नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर २०२०: लक्ष्मीविलास बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं एका महिन्यासाठी लक्ष्मीविलास बँकेवर काही नियम लादले आहेत. यानंतर १६ डिसेंबरपर्यंत बँक खातेधारक त्यांच्या खात्यातून २५,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) ही माहिती दिली आहे.
मध्यवर्ती बँकेनं असं म्हटलं आहे की स्थगिती कालावधीत आरबीआयच्या लेखी परवानगीशिवाय बँक खातेदार २५ हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास सक्षम होणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार सरकारनं हे पाऊल उचललं आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या आदेशात असं म्हटले आहे की लक्ष्मीविलास बँकेवर महिन्याभराची मुदतवाढ लागू करण्यात आली आहे. हे १७ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान लागू असेल. हा आदेश आरबीआय कायद्याच्या कलम ४५ अंतर्गत आणला आहे.
एनपीए वाढण्याची भीती
आरबीआय’च्या म्हणण्यानुसार हे पाऊल खूप महत्वाचं होतं, कारण बँकेचे कर्ज सतत वाढत जात होतं आणि नवीन एनपीएचा धोका निर्माण झाला होता. तथापि, आरबीआयनं लक्ष्मी विलास बँक ग्राहकांना त्यांचं हित पूर्णपणे संरक्षित केलं जाईल आणि घाबरून जाण्याची गरज नाही अशी ग्वाही दिली.
९४ वर्षीय लक्ष्मी विलास बँक चे (एलव्हीबी) व्यवस्थापन मंडळ बऱ्याच काळापासून गोंधळलेल्या अवस्थेत होते. बँक गेल्या काही वर्षांपासून भांडवल वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु यशस्वी झाली नाही. नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीत विलीनीकरणाचा प्रस्ताव आरबीआयनं २०१९ मध्ये फेटाळला होता.
बँकेवर संकटाचे सावट
एसएमई (लघु आणि मध्यम उद्योग) ऐवजी मोठ्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली तेव्हा बँकेची समस्या सुरू झाली. फार्म कंपनी रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंग आणि शिविंदर सिंग यांच्या गुंतवणूकीच्या युनिटला बँकेने ७२० कोटी रुपयांचं कर्ज दिलं. येथूनच बँकेची समस्या सुरू झाली. यानंतर बँकेचा तोटा वाढू लागला. त्याच वेळी, सप्टेंबर २०१९ मध्ये एनपीएची होणारी वाढ पाहता, रिझर्व बँकेनं त्वरित ह्या बँकेला सुधारात्मक कारवाईखाली ठेवले. २०१९-२० या आर्थिक वर्षात बँकेचं ८३६.०४ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं, जे २०१८-१९ मध्ये ८९४.०९ कोटी रुपये होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे