आरबीआयनं लावला देशातील १४ बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, ८ जुलै २०२१: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) तिच्या मार्गदर्शक सूचना व तरतुदींचं पालन न केल्यामुळं देशातील १४ बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

या नियमांचे उल्लंघन केले

केंद्रीय बँकेनं बँकांसाठी काही तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती. यामध्ये ‘नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना कर्जे (एनबीएफसी)’, ‘एनबीएफसीला बँक फायनान्स’, ‘कर्जे आणि अग्रिम – वैधानिक आणि इतर निर्बंध’, ‘सर्व बँकांमध्ये मोठ्या कॉमन एक्स्पोजरसाठी सेंट्रल रिपॉझिटरी तयार करणे’ या तरतुदींचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त, ‘मोठ्या कर्जाच्या केंद्रीय भांडारांना अहवाल देण्यासंबंधी परिपत्रके, लघु बँकिंग फायनान्स बँकाच्या संचालनासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि बँकिंग नियमन कायदा- १९४९ मधील कलम -१९(२) आणि कलम -२० (१) चे उल्लंघन केल्याबद्दल बँकांवर हा दंड ठोठावण्यात आलाय.

या १४ बँकांना दंड ठोठावण्यात आला

आरबीआयनं ज्या १४ बँकांना दंड ठोठावला आहे त्यांच्यामध्ये बंधन बँक लि., बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुईसी एजी, इंडियन बँक, इंडसइंड बँक लि., कर्नाटक बँक लि., करूर वैश्य बँक लि. , पंजाब अँड बँक लि. सिंध बँक, साउथ इंडियन बँक लिमिटेड, भारतीय स्टेट बँक, जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड.

आरबीआयनं यापूर्वी बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु त्याच्या उत्तरावर असमाधानी झाल्यानंतर त्यांनी हा दंड ठोठावला. या सर्व बँकांवर ५० लाख रुपयांपासून २ कोटी रुपयांपर्यंत दंड लावण्यात आलाय.

बँक ऑफ बडोदावर सर्वाधिक दंड

बँक ऑफ बडोदावर आरबीआयनं सर्वाधिक २ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. त्याचवेळी एसबीआयवर सर्वात कमी दंड ५० लाख रुपये लादला गेला आहे. इतर सर्व बँकांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा