रिझर्व्ह बँकेने पुन्हा रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवला, कर्ज महागले, वाढणार तुमचा EMI

RBI MPC जून 2022, 8 जून 2022: महागाई अनेक वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचल्यामुळे, रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याची घोषणा केली. आता रेपो दर 0.50 टक्क्यांनी वाढून 4.90 टक्के झालाय. सुमारे महिनाभरात रेपो दरात ही सलग दुसरी वाढ आहे.

रिझर्व्ह बँकेकडं उरला नाही दुसरा पर्याय

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या जूनमधील बैठकीनंतर आज रेपो दरात वाढ केल्याची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची ही तीन दिवसीय बैठक सोमवारपासून सुरू होती आणि आज तिचा समारोप झाला. आरबीआय एमपीसीची या आर्थिक वर्षातील ही तिसरी बैठक होती. बैठकीत, समितीच्या पाच सदस्यांनी गव्हर्नर दास यांच्या नेतृत्वाखाली चलनवाढ आणि आर्थिक वाढीच्या वास्तुशास्त्रीय परिस्थितीवर चर्चा केली. अनियंत्रित महागाई पाहता सध्या रेपो दरात वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं समितीच्या सदस्यांनी मान्य केलं.

गेल्या महिन्यात बोलावावी लागली तातडीची बैठक

यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दीर्घ कालावधीनंतर गेल्या महिन्यात रेपो दरात अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. गव्हर्नर दास यांनी अचानक झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं की, रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ते म्हणाले होते की, केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक घेतली. त्या बैठकीतही एमपीसीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दरात 0.40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मे महिन्यात रेपो दरासोबतच रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) 0.50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, एमपीसीने एकोमोडेटिव्ह मौद्रिक धोरणाची भूमिका कायम ठेवली.

अशी आहे देशातील महागाईची स्थिती

सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7.8 टक्के होता, जो मे 2014 नंतरचा उच्चांक आहे. त्याचप्रमाणे एप्रिल 2022 मध्ये घाऊक महागाईचा दर 15.08 टक्क्यांपर्यंत वाढला होता, जो डिसेंबर 1998 नंतरचा उच्चांक आहे. एप्रिल महिन्यातील विक्रमी महागाईसाठी अन्न आणि इंधनाची महागाई जबाबदार होती.

अन्नधान्य चलनवाढीचा दर मार्चमध्ये 7.68 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये 8.38 टक्क्यांवर पोहोचला. मे महिन्यातील महागाईची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, यापूर्वी टोमॅटोचे दर ज्या प्रकारे वाढले आहेत, त्यामुळे महागाईचा दर चढा राहण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करणं, कच्च्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क काढून टाकणं आणि विमान इंधन (ATF) च्या किमती खाली आणणं यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. या प्रयत्नांमुळं महागाई थोडी कमी होऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा