हरियाणामध्ये RDX सापडण्याचं सत्र सुरूच, पुन्हा १.५ किलो RDX जप्त

हरियाणा, १३ सप्टेंबर २०२२: हरियाणाच्या कैथलमध्ये दीड किलो आरडीएक्स मिळाल्याने प्रशासनाची चिंता वाढलीय. आरडीएक्ससोबत डिटोनेटर आणि मॅग्नेटही सापडले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा संशयाची सुई पाकिस्तानवर फिरू लागली आहे. हे आरडीएक्स ड्रोनद्वारे भारतात पाठवलं जात असल्याचं बोललं जात आहे. एकट्या हरियाणात ८ महिन्यांत घडलेली ही चौथी घटना आहे ज्यामध्ये पाकिस्तानी कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोमवारी कैथलमध्ये पोलिसांना १.५ किलो आरडीएक्स सापडले होते. तपास पुढं केला असता, मार्च महिन्यात अंबाला येथे जसा आरडीएक्स प्लांट पाहिला होता त्याच पद्धतीने कैथलमध्येही केल्याचं निष्पन्न झालं. वास्तविक, पोलिसांना अंबाला येथे १.५० किलो स्फोटकांसह तीन जिवंत हातबॉम्ब सापडले होते. आता त्या वेळीही ड्रोन थिअरी सुरू होती आणि आता कैथल प्रकरणातही त्याला वेग आलाय. पाकिस्तानच्या माध्यमातून ड्रोनद्वारे स्फोटकं भारतात पाठवली जात असल्याचा दावा केला जात आहे. हरियाणाशिवाय पंजाबमध्येही अशी स्फोटके सातत्याने सापडत आहेत. कधी टिफिन बॉम्बच्या माध्यमातून कट रचण्याचा प्रयत्न केला जातो तर कधी आयईडीच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न होतो.

गेल्या काही महिन्यांवर नजर टाकली तर अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं कळतं. मे महिन्यात तपास यंत्रणेने कर्नालमध्ये चार दहशतवाद्यांना अटक केल्यावर या सर्वात मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला होता. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आयईडी आणि इतर शस्त्रे सापडली आहेत. त्या सर्व दहशतवाद्यांचे संबंध पाकिस्तानात बसलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडासोबत असल्याचं समोर आलं होतं. तपास यंत्रणांच्या मते, आता असाच ट्रेंड कैथल प्रकरणातही पाहायला मिळतो, ज्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानमध्ये बसलेला दहशतवादी नेता आहे. ही स्फोटकं हरियाणामार्गे देशातील अन्य राज्यांमध्ये नेण्याची तयारी सुरू आहे, ही चिंतेची बाब आहे.

यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये करण्यात आलेल्या तपासात हरियाणाचा वापर केवळ वाहतूक मार्ग म्हणून केला जात असल्याचे समोर आले आहे. ती स्फोटकं इतरत्र नेणं हा खरा उद्देश असू शकतो. ऑगस्ट महिन्यातही कुरुक्षेत्र जिल्ह्यात १.३ किलो आरडीएक्स सापडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून समशेर सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली, ज्यावर आयईडी पेरण्याचा आरोप होता. आता मोठी गोष्ट म्हणजे मे महिन्यातील घटनेत थेट पाकिस्तानी कनेक्शन सिद्ध झालं असलं तरी अन्य प्रकरणांमध्ये असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.

आता हरियाणामध्ये आरडीएक्स जप्त होत असेल तर पंजाबमध्ये टिफिन बॉम्बने चिंता वाढवलीय. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंजाब पोलिसांनी एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. त्या गटाचे नाव होते खलिस्तान टायगर फोर्स. या संघटनेच्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून टिफिन बॉम्ब सापडला, याशिवाय २ पिस्तुले, ग्रेनेड आणि स्फोटकांचे संपूर्ण पाकीट सापडले. आता त्यातच हे टिफीन बॉम्ब पाकिस्तानात बनवल्याचा दावा करण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा