मंदीचं सावट? आता या कंपनीने १०,००० लोकांना काढलं कामावरून !

5

पुणे, ९ ऑगस्ट २०२२: जगावर आर्थिक मंदीचा धोका वाढतोय. महागाईचा दुहेरी फटका बसत आहे. त्याचा परिणाम अमेरिकेपासून चीनपर्यंत दिसून येत आहे. या सगळ्यात जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये कामगार कमी होताना दिसत आहे. ॲमेझॉन, वॉलमार्ट आणि फोर्डनंतर आता चीनच्या मोठ्या कंपनीने एकाच वेळी १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

९,२४१ हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं

एका मीडिया रिपोर्टनुसार, चीनी टेक कंपनी अलीबाबाने आपल्या ९,२४१ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. एका वृत्तवाहिनीच्या वेबसाईट अहवालात साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्याने म्हटलंय की, या टाळेबंदीनंतर अलीबाबामधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे २४५,७०० वर आलीय. यापूर्वी अलीकडंच, रिटेल क्षेत्रातील दिग्गज वॉलमार्टनेही आपल्या २०० कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात बाहेरचा रस्ता दाखवला होता. कंपनीने वाढता खर्च आणि कमकुवत मागणी नमूद केली होती.

चीन सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ

चीन ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ आहे आणि अलीबाबा या क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. बिझनेस टुडेवर गुरुवारी प्रकाशित झालेल्या रॉयटर्सच्या अहवालानुसार, अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडने कोणत्याही तिमाहीत प्रथमच सपाट महसूल वाढ पाहिली आहे.

जून २०२२ अखेर कंपनीचा महसूल २०५.५६ अब्ज युआन किंवा ३०.४३ अब्ज डॉलर वर अपरिवर्तित राहिला. अलीकडील टाळेबंदीच्या संदर्भात मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या खर्चात कपात आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर देत आहे.

कंपनी व्यवस्थापनाने दिले होते संकेत

मंदीच्या काळात जॅक माची कंपनी अलिबाबाचे सीईओ डॅनियल झांग यांनीही खर्चात कपात करण्याबाबत बोललं. झांग म्हणाले होते की, कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढल्याने भौगोलिक राजकीय परिस्थिती कंपनीवर परिणाम करू शकते. यावेळी आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं. अहवालानुसार, चीनच्या इतर टेक कंपन्यांमध्ये कामावरून कमी करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झालीय.

अजून अनेक कंपन्यांनी केली तयारी

यापूर्वी अॅमेझॉननेही आपल्या कर्मचाऱ्यांची एक लाख कपात केली होती. त्याचवेळी वॉलमार्टनंतर इतरही अनेक बड्या कंपन्या असं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. अहवालांवर विश्वास ठेवला तर, फोर्ड मोटर आर्थिक क्रियाकलाप मंदावताना सुमारे ८,००० कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. Facebook ची मूळ कंपनी Meta Platforms Inc. ने देखील नोकरभरतीत ३० टक्के कपात करण्याची योजना आखली आहे. याशिवाय गुगलने नोकरभरतीची गती कमी केली आहे.

Crunchbase च्या अहवालात असं म्हटलंय की सिलिकॉन व्हॅलीमधील इतर अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची बडतर्फी केली आहे. या कंपन्यांनी सुमारे ३२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये Twitter, TikTok, Shopify, Netflix सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा