पुणे, 17 एप्रिल 2022: गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मध्ये राज ठाकरेंनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे तत्काळ काढण्यास सांगितलं होतं. त्यांच्या या भाषणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. अशातच काल राज ठाकरेंनी (16 एप्रिल) पुण्यातील खालकर चौक हनुमान मंदिर येथे महाआरती केली. यावेळी मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आला. एकंदरीतच राज ठाकरेंच्या अलीकडील हालचाली पाहिल्या तर आणि कालचं रूप पाहिलं तर त्यांची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट होते.
संपूर्ण देशात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः सायंकाळी पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिरात श्रीहनुमानाची महाआरती केली. pic.twitter.com/c9rTRJw0bt
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 16, 2022
एकंदरीत राज ठाकरेंसाठी आगामी निवडणुकीत हिंदुत्व हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. याचं उदाहरण काल बघण्यास मिळालं. मंदीरात पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांच्या खांद्यावर भगवी शाल देण्यात आली. त्यावेळी मनसैनिकांकडून देण्यात आलेली गदा राज यांनी वरती उचलून धरली. मंदीरात देण्यात आलेलं आरतीचं ताट हातात घेत राज यांनी हनुमानाची सगळ्यासोबत आरतीही केली. राज ठाकरे यांचं हे रुप मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनच राज्यात राजकारण करणार हे स्पष्ट करणारं आहे.
मनसेचे पुण्यातील नेते अजय शिंदे यांनी कुमठेकर रोडवरील खालकर मारुती मंदिर येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हनुमान चालिसा कार्यक्रमास येणार असल्याने अजय शिंदे यांनी जय्यत तयारी केली होती.