Record breaking divorce Pune :आधुनिक युगात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असले, तरी पुणे शहरात एक अत्यंत वेगळा आणि विक्रमी घटस्फोट समोर आला आहे. उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ जोडप्याने केवळ 13 दिवसांत घटस्फोट मिळवला आहे. स्मिता आणि राकेश (नावं बदललेली) या जोडप्याचा विवाह ऑक्टोबर 2020 मध्ये झाला होता, पण त्यांच्यात लवकरच वैचारिक मतभेद निर्माण झाले. डिसेंबर 2022 पासून ते दोघेही वेगळे राहत होते.
अखेर, त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे यांनी या अर्जावर तातडीने कार्यवाही केली आणि 11 मार्च 2025 रोजी घटस्फोट मंजूर केला.ॲड. ऋतुजा पोपट क्षीरसागर आणि ॲड. प्रांजल किशोर पाटील यांनी या जोडप्याचे प्रतिनिधित्व केले.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी जोडपे 18 महिने वेगळे राहत असल्यास, 6 महिन्यांचा अनिवार्य कालावधी माफ केला जाऊ शकतो. याचाच अर्थ, स्मिता आणि राकेश यांनी 2022 पासून वेगळे राहिल्यामुळे, त्यांना त्वरित घटस्फोट मिळू शकला.
ॲड. ऋतुजा क्षीरसागर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “दोन उच्चशिक्षित व्यक्ती चार वर्षांपासून वेगळे राहत होत्या. ते परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तयार होते. या निर्णयामुळे त्यांचा वेळ वाचला आणि आता ते दोघेही स्वतंत्रपणे आपले आयुष्य जगू शकतील.”
या विक्रमी घटस्फोटामुळे घटस्फोट प्रक्रियेतील कायदेशीर सुधारणा आणि परस्पर संमतीने घटस्फोटाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. समाजात बदलत्या विचारसरणीमुळे अशा प्रकारचे निर्णय अधिक स्वीकारले जात आहेत, हे या घटनेवरून स्पष्ट होते
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे