सलग १०व्या महिन्यात विक्रम, डिसेंबरमध्ये जीएसटीने भरली सरकारी तिजोरी

नवी दिल्ली, २ जानेवारी २०२३: सलग दहाव्या महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं (जीएसटी) विक्रमी संकलन झालंय. अर्थ मंत्रालयानं रविवारी सांगितलं की डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. हे वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीपेक्षा १५ टक्के अधिक आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलन सुमारे १.४६ लाख कोटी रुपये होतं, जे मागील वर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी जास्त होतं. जीएसटीमधून सरकारला भरपूर कमाई होत आहे.

कोणाचा किती वाटा?

मंत्रालयाने म्हंटलंय की डिसेंबर २०२२ मध्ये एकूण GST महसूल १,४९,५०७ कोटी रुपये होता. यामध्ये केंद्रीय जीएसटी २६,७११ कोटी रुपये, राज्य जीएसटी ३३,३५७ कोटी रुपये, आयजीएसटी ७८,४३४ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०२२ मध्ये नियमित सेटलमेंटनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST ६३,३८० कोटी रुपये आणि SGST ६४,४५१ कोटी रुपये होता. ३६,६६९ कोटी रुपयांचा CGST वाटा नियमित सेटलमेंट म्हणून आणि ३१,०९४ कोटी रुपयांचा SGST वाटा सेटलमेंट झालाय.

मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल

IGST मध्ये वस्तूंच्या आयातीतील रक्कम (४०,२६३) देखील समाविष्ट आहे. याशिवाय उपकराचा हिस्सा ११,००५ कोटी रुपये आहे. यामध्ये मालाच्या आयातीतून ८५० कोटी रुपये मिळाले आहेत. नोव्हेंबरमध्ये ७.९ कोटी ई-वे बिलं व्युत्पन्न झाली, जी ऑक्टोबरमध्ये व्युत्पन्न झालेल्या ७.६ कोटी ई-वे बिलांपेक्षा खूपच जास्त होती.

या आर्थिक वर्षात जीएसटी संकलन

ऑक्टोबर २०२२ मध्ये जीएसटी संकलन १.५२ लाख कोटी रुपये होतं. सप्टेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलन १,४७,६८६ कोटी रुपये होतं. या आर्थिक वर्ष २०२३ बद्दल बोलायचं झालं तर सप्टेंबरमध्ये १.४७ लाख कोटी, ऑगस्टमध्ये १.४३ लाख कोटी, जुलैमध्ये १.४८ लाख कोटी, जूनमध्ये १.४४ लाख कोटी, मेमध्ये १.४० लाख कोटी आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटी रुपये GST संकलन होते.

मंत्रालयानौ काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. जीएसटी कौन्सिलनं गेल्या काही महिन्यांत चांगल्या अनुपालनासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. रिझर्व्ह बँक रेपो दरात सातत्यानं वाढ करत असताना जीएसटीचे संकलन वाढत आहे. डिसेंबरमध्येही मध्यवर्ती बँकेनं रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा