नगर जिल्ह्यात लोक अदालती मध्ये संगमनेर पंचायत समितीची ६० लाखांची विक्रमी वसूली

नगर, १४ नोव्हेंबर २०२२ : नगर जिल्ह्यातील संगमनेर पंचायत समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या लोक अदालतीत विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी आणि पाणीपट्टी ची सुमारे ६० लाख रूपयांची वसूली करण्यात आली. लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विक्रमी वसूली मानली जाते आहे.

या लोकअदालतिसाठी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचबरोबर पुढील काळात उर्वरीत थकबाकी वसूलीसाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीकडील घरपट्टी, पाणीपट्टी थकीत होती.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्याची सर्वाधिक वसुली झालेली आहे. यासाठी प्रथम श्रेणी.अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा, वरिष्ठ स्तर अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एम. एच शेख, वरीष्ठ स्तर अतिरिक्त मुख्य न्यायाधिश एस.एस. बुद्रुक, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी.डी. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका बार असोशिएशनचे वकील यांच्या सहकार्यांने या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.

न्यायाधीशांनी नुकतंच पंचायत समितीचे सभागृहामध्ये ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून जास्तीत जास्त वसुली कशी करता येईल या दृष्टीने मार्गदर्शन केलं होतं. यासाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पंचायत समिती मार्फत उत्तम कामगिरी केली जाईल असं सांगितलं होतं. त्यासाठी व्यक्तिशः लक्ष घालून उच्चांकी वसुली करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर वसूली करण्यात यश मिळालं.

गावाच्या विकासात ग्रामपंचायतीचं योगदान मोलाचं असतं. त्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. नागरिकांनी हा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींचं घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं होतं. त्याला तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा