हवामान विभागाकडून रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर ठाणे रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

5

मुंबई, १९ जुलै २०२३ : कोकण आणि मुंबई पट्ट्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. रस्ते, रेल्वे वाहतूक मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. अजूनपर्यंत तरी, सर्व काही सुरळीत सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक कोलमडल्यास मुंबईचा वेग रोडवला जाऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने बुधवारसाठी मुंबई शहर आणि उपनगरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या काही भागात आज पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी काही भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. ठाणे, रत्नागिरी आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुढच्या ३ ते ४ तासात सिंधूदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या ३ ते ४ तासात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस बंद राहणार असल्याच त्यांनी सांगितले आहे. तर चंद्रपुरातही मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दिवसभरात ११५.६ मीमी ते २०४.४ मीमी पाऊस झाल्यानंतर ऑरेंज अलर्ट दिला जातो. दिवसभरात २०४.५ मीमी च्या पुढे पाऊस झाल्यास रेड अलर्ट दिला जातो.
औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, जळगाव, सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत मागच्या २४ तासात मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे ४७.४२ मीमी,५०.०४ मीमी आणि ५०.९९ मीमी पाऊस झाला.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनला अनुकूल स्थिती आहे. ही स्थिती किनाऱ्याच्या दिशेने सरकू लागेल, तेव्हा मुंबई आणि कोकण पट्टयात मुसळधार पाऊस होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा