मुंबई,२७ जुलै २०२३ : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय. मुंबईला काल २६ जुलै रोजी ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार मुंबईसह आसपासच्या ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या शहरांना पावसाने झोडपून काढले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तर कुठे पाणीही साचले.सुरु असलेल्या पावसादरम्यान मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईला २६ जुलै रात्री ८ पासून २७ जुलै दुपारपर्यंत रेड अलर्टचा इशारा दिला आहे. या रेड अलर्टच्या इशाऱ्यानुसार मुंबईत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तसेच महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिकेच्या शाळांसह, खासगी शाळा आणि सर्व महाविद्यालयांना २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणतीही जोखीम नको म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या ट्विटर हॅन्डलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
हवामान विभागाने मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला काल रात्री ८ ते आज दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाऱ्या १५ परीक्षा रद्द करत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबईकरांसाठी एक दिलासा बातमी सुद्धा आहे. मुंबईला एकूण ७ तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे ७ पैकी २ तलाव हे ओसंडून वाहू लागले आहेत. तानसा आणि विहार तलाव हे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान पावसाचा धोका पाहता महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना सतर्क राहायला सांगितले आहे. तसेच गरज असल्यास आणि महत्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर