भारतात बऱ्याच आधीपासून रानकोंबडा अस्तित्वात असुन रानकोंबड्यांच्या दोन जाती भारतात आढळतात. एक लाल रानकोंबडा आणि दुसरा भुरकट(ग्रे) रानकोंबडा. लाल रानकोंबडीचे शास्त्रीय नाव गॅलस गॅलस आणि भुरकट रानकोंबडीचे गॅलस सोनेरेटाय असे आहे. फॅजिॲनिडी या पक्षिकुलात रानकोंबड्यांचा समावेश होतो. आज अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाळीव कोंबड्यांचा पूर्वज लाल रानकोंबडा हाच पक्षी आहे, असे पुराव्यांवरून समजले जाते. लाल रानकोंबडा हा पक्षी फार प्राचीन काळी भारतात पाळीव बनवला गेला असावा.
लाल रानकोंबडा हा पक्षी भारत, ब्रह्मदेश, थायलंड, मलाया द्वीपकल्प, सुमात्रा या प्रदेशांत आढळतो. भारतात हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांपासून पूर्वेस आसाम, बंगाल, ओरिसापर्यंत आणि दक्षिणेस गोदावरी नदीपर्यंत लाल रानकोंबडा आढळतो. हिमालयात दीड हजार मीटर उंचीपर्यंत तो दिसून येतो. भारताच्या ज्या भागात साल वृक्ष आणि बारशिंगा यांचा प्रसार झालेला आहे, त्या सर्व भागांत हा पक्षी आढळतो. हा मुख्यतः जंगलात राहणारा पक्षी असला तरी, दाट झुडपे असणाऱ्या जंगलातही आढळतो. टेकड्यांच्या पायथ्याच्या प्रदेशात आणि शेतीच्या आसपास राहणे याला विशेष आवडते. मार्चपासून मे पर्यंत यांचा विणीचा हंगाम असतो. दाट झुडपांच्या तळाशी उथळ खळगा करून त्यात वाळलेली पाने घालून घरटे तयार केलेले असते. मादी ५-६ अंडी घालते. ती पाळीव कोंबड्यांच्या अंड्यासारखीच असतात.
लाल रानकोंबडा पाळीव कोंबडीएवढा असतो. नर आणि मादी यांच्या रंगात फरक असतो. नराच्या डोक्यावरचा तुरा आणि मानेवरची विखुरलेली पिसे नारिंगी-तांबडी किंवा सोनेरी-पिवळी असतात. पाठीकडचा रंग तकतकीत असुन काळसर ताबंडी शेपटी आणि तिला झाकणारी पिसे ही हिरवी,जांभळी छटा असलेल्या काळ्या रंगाची असतात. पोटाकडचा भाग काळा असुन मादीचा रंग साधा तपकिरी आणि त्यावर रेषा असणारा तसेच शरीराचा खालचा भाग तांबूस तपकिरी, शेपटीची पिसे गडद तपकिरी तर तुरा शेंदरी असतो. तीनचार माद्या आणि एक नर यांचा एक समुह असतो. पहाटे आणि तिसऱ्या प्रहरी शेतातून किंवा जंगलाच्या कडेला हे भक्ष्य टिपीत असतात दुपारी विश्रांती घेतात. धान्य, बी, वनस्पतीचे कोंब, किडे, सरडे हे यांचे भक्ष्य आहे. रात्री झाडांवर किंवा बांबूच्या बेटात हे आश्रय घेतात. यांचा आवाज पाळीव कोंबड्यांसारखाच पण जास्त कर्कश असतो. पाळीव कोंबड्यांप्रमाणेच सकाळी सकाळी आरवण्याची यांची सवय आहे.
भुरकट(ग्रे) रानकोंबडा ही जात फक्त भारतात आढळणारी असून पश्चिम आणि दक्षिण भारतातील रानात आणि डोंगराळ प्रदेशात ती राहते. ग्रे रानकोंबडी अतिशय भित्री असून दिवसा लपून बसते व पहाटे आणि संध्याकाळी भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडते. हे एकएकटे किंवा जोडप्याने असतात. धान्य, बी, किडे, लहान फळे आणि झाडांचे कोंब हे यांचे खाद्य आहे. यांचा प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून मे पर्यंत असतो. यांच्या बहुतेक सवयी लाल रानकोंबड्यांच्या सवयीसारख्याच असतात.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.













































