मुंबई, दि. १२ जून २०२०: महाराष्ट्रामध्ये कोविड -१९ बाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे नव्याने ५०० बेड्स आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देणार आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के झाला आहे. धारावी भागातून रुग्ण येण्याची संख्या मंदावली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
जळगाव येथील बाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांचे निलंबन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर त्या भागातील व्यवहार २८ दिवस बंद ठेवले जातात. बंद काटेकोरपणे पाळला जाण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांना आराम मिळावा, त्याचा वापर अन्यत्र होण्यासाठी हा कालावधी १४ दिवस करण्याची मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे.
कोरोना व्यतिरिक्त आजारांच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी सरकारकडे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी