रजिस्टर पोस्ट सेवा बंद नाही, तर होणार अधिक वेगवान!

पोस्टाची नोंदणीकृत (रजिस्टर) सेवा १ सप्टेंबरपासून बंद होणार असल्याच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. चिंचवड पोस्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ही सेवा बंद केली जात नाही. उलट ती अधिक जलद आणि आधुनिक करण्यासाठी पोस्ट खात्याने नवी पावले उचलली आहेत.

भारतीय पोस्टच्या नव्या सुधारणा योजनेनुसार, आता नोंदणीकृत पोस्ट सेवेसाठी हवाई मार्गाचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी ही सेवा प्रामुख्याने रस्तेमार्गे केली जात होती, ज्यामुळे वितरणासाठी जास्त वेळ लागत असे. परंतु आता हवाई वाहतुकीमुळे वितरणाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे आणि महत्त्वाची कागदपत्रे वेळेत पोहोचणार आहेत.

विश्वासार्हता आणि सुरक्षितता कायम

नोंदणीकृत पोस्ट सेवेमध्ये पार्सल किंवा पत्र फक्त नोंदीत असलेल्या व्यक्तीलाच दिले जाते. त्यासाठी स्वाक्षरी घेतली जाते आणि पावती तयार केली जाते. त्यामुळे या सेवेची विश्वासार्हता आणि सुरक्षितता कायम राहणार आहे.

ग्राहकांसाठी नवी सुविधा

प्रेषकांना आता दोन पर्याय मिळणार आहेत:

  1. सामान्य डिलिव्हरी – पत्र कोणालाही स्वीकारता येईल.
  2. पत्ता-विशिष्ट डिलिव्हरी – फक्त नोंदीत असलेल्या व्यक्तीलाच पत्र दिले जाईल.

ही नवी लवचिक सुविधा फक्त दहा रुपयांच्या पावतीवर उपलब्ध होईल.

पोस्ट खात्याचे आवाहन

चिंचवड पूर्व मुख्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक नितीन बने यांनी सांगितले की, “नोंदणीकृत पोस्ट सेवा ही अत्यंत विश्वासार्ह आहे. ती बंद केली जात नाही. उलट ती अधिक जलद, आधुनिक आणि सोयीस्कर करण्यासाठी सुधारणा सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे