भागलपूर, दि. २३ जुलै २०२०: बिहारमध्ये कोरोना विषाणूमुळे परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. दररोज केसेसची संख्या वाढतच आहे, त्याबरोबर रुग्णालयात सुविधांचा असलेला अभाव रूग्णांसाठी समस्या बनू लागली आहे. भागलपूरमधील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलची अवस्था भयानक बनली आहे. राज्यातील कोविड विशेष रुग्णालयात या रुग्णालयाचा समावेश आहे. येथे एका कुटूंबाने डॉक्टरच्या सल्ल्याविरोधात रुग्णाला दवाखान्यापासून दूर नेले, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भागलपूरच्या या रूग्णालयात एकूण ८०० बेड आहेत, परंतु रुग्णालयात उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. दरम्यान, येथे एक मोठे घटना घडली. डॉक्टरांनी सांगितले की रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या आय सी यु मधून एका रुग्णाला त्याच्या परिजनांनी बाहेर काढत असे सांगितले की त्या व्यक्तीला मोकळ्या हवेची गरज आहे म्हणून आम्ही त्याला बाहेर घेवून जात आहोत, यावेळी डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांना असे करण्यापासून रोखले परंतु त्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले नाही.
या घटने नंतर रूग्णाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण बाब १९ जुलैची आहे पण आता या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे. कटिहार येथे या रूग्णाला आणले जात असताना रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या रूग्णालाला इतरत्र हलवण्यात येत होते. कुटुंबियांचा असा दावा आहे की, रुग्णालयामध्ये या व्यक्तीवर व्यवस्थितपणे इलाज होत नसल्या कारणाने त्यांनी हे पाऊल उचलले होते.
यासंदर्भात एक व्हिडिओ बनवत एका डॉक्टरने असा आरोप केला आहे की अतिदक्षता विभागा मधून या रुग्णाला बाहेर काढत असताना बेड व त्यासोबत ऑक्सिजन प्रणाली या नातेवाईकांनी ओढत बाहेर काढले. डॉक्टरांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी डॉक्टरांना देखील दम देण्याचा प्रयत्न केला. यावेळी या नातेवाईकांनी मास्क देखील घातला नव्हता. रुग्ण अती दक्षता विभागातून गायब झाल्यानंतर डॉक्टरांनी तेथील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये या विषयी तक्रार देखील नोंदवली होती.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर रूग्ण उपचारात मदत करत नाहीत तर मग त्यांचा कोरोनाशी सामना कसा केला जाईल. हे फक्त बिहारमधील रुग्णालयाचे चित्र नाही तर बर्याच रुग्णालयांमध्येही हे घडत आहे. भागलपूर असो वा राजधानी पटना.
राजधानी पटण्यातील नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (एनएमसीएच) मध्येही बिघडलेल्या स्थितीची छायाचित्रे दर्शविली गेली. यावर बातमी दाखविताच तातडीने आरोग्यमंत्री मंगल पांडे रुग्णालयात पोहोचले आणि सर्व काही ठीक असल्याचा दावा केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी