मुंबई, 22 जानेवारी 2022: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 18,549 कोटी रुपये होता. तर कंपनीचं एकत्रित उत्पन्न 1.9 लाख कोटी रुपये आहे.
मागील तिमाहीत (जुलै-सप्टेंबर 2021), रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकत्रित निव्वळ नफा 13,680 कोटी रुपये होता. तर एकत्रित उत्पन्न 1.7 लाख कोटी रुपये होतं. त्यानुसार मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 4,869 कोटी रुपयांची वाढ झालीय.
कधीही सर्वोत्तम परिणाम
कंपनीच्या चांगल्या परिणामांबाबत मुकेश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटलंय की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केलीय. हे आतापर्यंतचे सर्वोत्तम परिणाम आहेत. कंपनीच्या सर्व व्यवसायांनी या तिमाहीत मजबूत योगदान दिलं आहे, ज्यामुळं कंपनीच्या परिचालन महसुलात चांगली वाढ झालीय. सणासुदीचा हंगाम आणि लॉकडाऊनमधील शिथिलता यामुळं खप वाढला असून रिटेल व्यवसायही पूर्वपदावर आला आहे. आमच्या डिजिटल व्यवसायाचा नफाही वाढलाय.
शुक्रवारी बीएसईवर या कंपनीचा शेअर 2,478.10 रुपयांवर बंद झाला. NSE वर त्याच्या शेअरची किंमत 2,476.05 रुपये होती. मुंबई शेअर बाजारात कंपनीचं बाजार भांडवल 16.76 लाख कोटी रुपये होतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे