रिलायन्स जिओ मध्ये होणार शुल्कवाढ

34

नवी दिल्ली: वोडाफोन आयडिया आणि भारतीय एअरटेल नंतर आता रिलायन्स जिओनी सुद्धा मोबाईल सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा थकबाकी असलेला कर भरण्याचा बोजा या कंपन्यांवर आल्यामुळे कदाचित हा निर्णय या कंपन्यांकडून घेण्यात येत असावा. वोडाफोन आयडिया, भारतीय एअरटेल यांच्यामध्ये तुलनेने मोठ्या प्रमाणावर शुल्कात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण रिलायन्स जिओ पेक्षा जास्त कर या कंपन्यांना सरकारला द्यावा लागणार आहे.
रिलायन्स जिओ कडून येत्या काही आठवड्यांमध्ये कॉल आणि डेटा शुल्कामध्ये वाढ करण्यात येणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत तोंड देताना महसूलात वाढ होण्यासाठी कंपन्यांकडून मोबाईल सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. रिलायन्स जिओ ने म्हटले आहे की, इतर दूरसंचार कंपन्यांनी प्रमाणे आम्हीसुद्धा सरकारच्या सहकार्याने या क्षेत्रातील अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत, देशातील ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या काही आठवड्यांनंतर आम्ही सेवा शुल्कामध्ये वाढ करण्याचे अंमलबजावणी होईल. ही अंमलबजावणी अशा पद्धतीने होईल की त्यामुळे डेटाचा वापर किंवा डिजिटल क्षेत्रातील वाढीला खीळ बसणार नाही. जिओ आणि तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्या वोडाफोन आयडिया आणि भारतीय एअरटेल यांनी एकाच वेळी मोबाईल सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.