अनिल देशमुखांना दिलासा; तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई,२६ सप्टेंबर २०२२ : मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने २१ मार्चपासून अनिल देशमुख यांची जामीन याचिका प्रलंबित असल्याची नोंद घेतली आहे.

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाला निर्देश दिले होते. त्यानुसार हायकोर्टाने सुनावणी घेण्यासह सुरुवात केली होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी एका खंडपीठाकडून दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली होती. सुरुवातीला एका न्यायमूर्तींनी याबाबतची सुनावणी ऐकली होती. यामध्ये केवळ तपास यंत्रणेचा युक्तिवाद बाकी होता. त्याचवेळी हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले. मात्र, जे न्यायमूर्तींकडे हे प्रकरण गेले होते त्यांनी काही वैयक्तिक कारणास्तव यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.

जामीन अर्ज दाखल करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपली याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल अशी कायदेशीर अपेक्षा असते. जामीन याचिका प्रलंबित ठेवणं कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही, असं खंडपीठाने सांगितलं आहे.

या सर्वामध्ये या प्रकणावरील सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे देशमुखांकडून यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आणि तसेच सर्व परिस्थितीबाबत कल्पना देण्यात आली. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने या सर्व बाबींची दखल घेत याच आठवड्यात या प्रकरणावरील सुनावणी घेत निकाल लवकरात लवकर लावण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा