कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी आयातीवरील अटींमध्ये सूट, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर २०२०: पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळेच सध्या बाजारात कांद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळं केंद्र सरकारने काल (२१ ऑक्टोबर) भारतातील कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी कांदा आयातीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे बाहेरील देशांमधून कांदा सहजपणे भारतात येऊन कांद्याच्या किमती कमी करण्यास मदत होणार आहे.

सरकारने रब्बी हंगामात उत्पादन झालेल्या कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे. कांद्याच्या किमती कमी होण्यासाठी या बफर स्टॉकमधील कांदे सप्टेंबर २०२० पासून बाजारात आणला जात आहे. केंद्र सरकार कांदा भंडारांमधून (बफर स्टॉक) अधिक प्रमाणात कांदा बाजारात आणणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांदा दरावर विपरीत परिणाम होणार आहे.

केंद्र सरकारने म्हटलं आहे, “कांदा आयातीला सहजसोपं बनवण्यासाठी २१ ऑक्टोबर २०२० रोजी आयातीसाठी प्लांट क्वारंटाईन ऑर्डर, २००३ अंतर्गत फायईटोसेन्टरी सर्टिफिकेटवर फ्यूमिगेशन आणि अतिरिक्त घोषणेच्या अटींमध्ये सूट देण्यात आली आहे. ही सूट १५ डिसेंबर २०२० पर्यंत असणार आहे.”

सध्या मुंबईच्या बाजारात कांदा ६७ रुपये प्रति किलो, चेन्नईत ७३ रुपये, दिल्लीत ५१ रुपये आणि कोलकात्यात ६५ रुपये प्रति किलो आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा