भिगवण, २९ सप्टेंबर २०२० : भिगवण(ता.इंदापूर) येथील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याठिकाणी खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे मात्र या कोविड केअर सेंटर मुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे यामुळे सदर कोविड सेंटर तातडीने स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी बारामती यांना केली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, सदर खाजगी कोविड सेंटर हे भिगवण मधील प्रभाग क्र. ४ येथे राष्ट्रीय महामार्गालगत, स्वामी विवेकानंद नगर या ठिकाणी असून हा संपूर्ण परिसर दाट लोकवस्तीचा आहे. याठिकाणी अनेक अपार्टमेंट व बंगले आहेत. तसेच याठिकाणी अनेक व्यवसाय व जवळच भिगवण बसस्थानक असल्यामुळे या सर्विस रोडला वाहनांची खूप वर्दळ असते त्यामुळे वेळोवेळी वाहतूकीची समस्या देखील निर्माण होते. या कोविड केअर सेंटर मधील रुग्ण सर्विंस रोडला बाहेर येऊन बसतात. शिवाय या सेंटरमध्ये अत्यावश्यक असलेल्या (टॉयलेट, बाथरूम, पार्किंग इत्यादी ) प्राथमिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत.
सदर कोविड सेंटरला स्वतंत्र ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे या कोविड सेंटरमधील सांडपाणी व बाथरुमचे सोडलेले पाणी रस्त्यावर व शेजारील घरांच्या दारामध्ये येत असल्याने सदर वसाहतीतील लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर कोविड सेंटर त्वरित दुसरीकडे स्थलांतर केले नाही तर, स्वामी विवेकानंद नगर भिगवण या सोसायटीतील असंख्य लोकांना संसर्ग होईल. एक प्रकारे हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार आहे. या कोविड सेंटरच्या जवळच आरोग्य खात्याची सरकारी भव्य इमारत असल्याने सदर रुग्णांवर संबंधित डॉक्टरांनी शासकीय इमारती मध्ये उपचार करणे शक्य आहे.
शासन एका बाजूला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत असताना भिगवण मधील या खाजगी कोविड सेंटरमुळे अनेक नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी प्रशासनाने यावर खबरदारी म्हणून सदर कोविड सेंटर इतर ठिकाणी स्थलांतरित करुन या भागातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे. अन्यथा या भागातील सर्व नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
सदर कोविड सेंटर कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी तयार केलेले असून, नियमाप्रमाणे सर्व सोयीसुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच हे सेंटर सुरू करण्यापूर्वी प्रांताधिकारी बारामती, तहसीलदार इंदापूर यांचेशी संपर्क करूनच सुरू केलेले आहे. याठिकाणी २२ बेड उपलब्ध असून ऑक्सीजन व व्हेंटीलेटर या सुविधादेखील उपलब्ध आहेत, हॉस्पिटल दिवसातून चार वेळा सेनीटाईझ केले जाते. सध्या येथे २० रुग्ण उपचार घेत असून, सर्व नियमांचे पालन करूनच हे सेंटर सुरू केले आहे. यात नियम बाह्य असे काही नाही.
असे डॉ. महेश गाढवे व डॉ. दत्तात्रय पवार कोविड हाॅस्पिटल, भिगवण यांनी सांगितलो.
सदर कोविड सेंटर संदर्भात तेथील स्थानिक नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन मिळाले असून, याबाबत आरोग्य विभागास चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.