पुणे, ११ मे २०२१: रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी फायद्याचे ठरत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र काही परिस्थितीतच हे इंजेक्शन करोना रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते असं केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले. दरम्यान रेमडेसिविर इंजेक्शन साठी नागरिकांनी ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावरून मोठा काळाबाजार देखील झाला. पण हे इंजेक्शन रुग्णांसाठी फारसं फायदेशीर नसल्याचे समोर आले आहे. आता पुण्यातील नागरिकांसाठी देखील रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. कोरोना रुग्णाला अगदीच गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसतील किंवा त्याला रेमडेसिविरची एलर्जी असेल तर त्यांना इंजेक्शन देऊ नये. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि एखादा अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठीही रेमडेसिविरचा वापर टाळावा, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन देऊ नये. गरजू रुग्णांनाच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जावे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णालयाचा रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशाराही पुणे महानगरपालिकेने दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे