गोल पोस्ट महाराष्ट्र सुप्रसिद्ध रानकवी ना.धों.महानोर यांचे निधन

सुप्रसिद्ध रानकवी ना.धों.महानोर यांचे निधन

पुणे, ३ ऑगस्ट २०२३ : प्रसिद्ध रानकवी,गीतकार ना.धों. महानोर यांचे निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी कवी ना. धों महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. ना.धों.महानोर यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. ग्रामीण जीवन सोप्या भाषेत शब्दबद्ध करणारा, गावगाड्यातील गोष्टी सुटसुटीत शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे.

नामदेव धोंडो महानोर हे ना.धों.महानोर यांचं संपूर्ण नाव. ते मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील पळसखेडा गावातील. १६ सप्टेंबर १९४२ ला त्यांचा जन्म झाला. पळसखेडा, पिंपळगाव, शेंदुर्णी या ठिकाणी त्यांनी शालेय शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला गेले. पहिले वर्ष संपताच त्यांना पुन्हा गावाची ओढ लागली. त्यांनी शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा गावी आले. तिथे त्यांना जीवनाचा सूर गवसला. नजरेला दिसणारा निसर्ग त्यांनी शब्दात मांडला.ना.धों. महानोर यांची लेखनी जेव्हा चालायची तेव्हा हुबेहूब निसर्ग कागदावर रेखाटला जायचा. म्हणूनच साहित्य विश्वाने त्यांना रानकवी ही उपाधी दिली.

ना.धों.महानोर यांनी मांडलेल्या साहित्यसंपदेत,अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, या कविता संग्रहांचा समावेश आहे. रपसप, गावातल्या गोष्टी हे त्यांचे कथा संग्रह लोकप्रिय ठरले. ना. धों. यांना शेतीची विशेष आवड होती. कापूस खोडवा आणि शेती, आत्मनाश व संजीवन ही शेतीविषयक पुस्तके साहित्य प्रेमीसाठी पर्वणी आहेत.

नो. धों. यांनी चित्रपटांसाठी गीतलेखनही केले. अबोली, एक होता विदूषक, जैत रे जैत, दूरच्या रानात केळीच्या बनात, दोघी, मुक्ता, सर्जा, मालक, ऊरुस अजिंठा, यशवंतराव चव्हाण या सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ना. धों. महानोर हे राजकारणातही सक्रीय होते. १९७८ साली महानोर हे विधान परिषदेचे आमदार होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version