वाराणसी, 21 जून 2022: ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देणारे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांची बदली करण्यात आली असून त्यांना वाराणसीहून बरेली जिल्ह्यात पाठवण्यात आलंय. या बदलीचं कोणतंही कारण प्रशासनाने दिलेलं नाही, मात्र ज्ञानवापी प्रकरणात त्यांनी सक्रिय भूमिका बजावल्यानं त्यांची बदलीही महत्त्वाची मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वी रवी कुमार दिवाकर यांनी सांगितलं होतं की, त्यांना धमकीचे पत्र देण्यात आलं होतं. त्या पत्रात ज्ञानवापीबाबतच्या त्यांच्या निर्णयालाही विरोध करण्यात आला होता. याआधीही रविकुमार दिवाकर यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले असता त्यांनी आपण व त्यांचं कुटुंब सुरक्षित नसल्याचं नमूद केलं होतं. साध्या प्रकरणांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. भीती इतकी आहे की माझ्या कुटुंबाला माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे.
जेव्हापासून न्यायाधीशांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं, तेव्हापासून पोलिसांनी त्यांची सुरक्षा खूप वाढवली आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, त्यांच्या सुरक्षेसाठी 9 पोलीस सतत तैनात असतात. ते त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचंही संरक्षण करतात. आता त्या सर्व सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांची वाराणसीहून बरेलीला बदली करण्यात आलीय. या बदलीबाबत रविकुमार दिवाकर यांच्या बाजूनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सरकारनेही या निर्णयावर कोणतेही तपशीलवार विधान जारी केलेलं नाही.
सध्या याप्रकरणी शिवलिंग असलेला परिसर सील करण्यात आलाय. अनेक प्रसंगी हिंदू बाजूने तेथे पूजा करण्यासाठी परवानगी मागितली आहे, परंतु न्यायालयाने ती परवानगी दिलेली नाही. तसे, या प्रकरणातील वादग्रस्त टिप्पणीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. हे प्रकरण वाराणसीच्या MP-MLA न्यायालयात प्रलंबित असून पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुनावणी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे