भिगवण स्टेशन परिसरातील “त्या” व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

7

इंदापूर, दि.३० एप्रिल २०२०: इंदापुर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील परिसरात एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे (दि.२८) एप्रिल रोजी स्पष्ट झाले होते. या महिलेच्या संपर्कात तीच्या कुटुंबातील मुलगा, सुन व दोन नातवंडे यांसह इतर २४ अशा एकूण २८ व्यक्ती आल्या होत्या. त्यापैकी २४ व्यक्तीचे स्वैब घेण्यात आले होते. यापैकी १८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्या सर्व १८ व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मंगळवार( दि.२८) एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन परिसरात एक ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. कोरोना मुक्त असणाऱ्या इंदापूरमध्ये कोरोना महाविषाणूने प्रथमच प्रवेश केला होता. त्यामुळे इंदापूरकरांची चिंता वाढली होती. या महिलेच्या संपर्कात एकूण २८ व्यक्ती आल्याने नेमके पुढे काय घडणार हा प्रश्न सर्वाना भेडसावत होता.

यामध्ये बाधित महिलेच्या कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश असून सर्व कुटुंबीयांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर सदर महिलेला उपचारासाठी भिगवण येथील खाजगी आय.सी.यू मधील एक डॉक्टर व लॅबरोटरी मधील पँथालॉजिस्ट यांसह १४ व्यक्तींशी संपर्क आला होता.

मात्र या सर्वांच्या कोरोना चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. तर महिलेच्या संपर्कातील आणखी सहा व्यक्तींचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नसून बारामतीमधील एका हॉस्पीटल मधील चार व्यक्तींना होम कॉरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. अमित उदावंत यांनी दिली.

प्रशासनानाने या २८ पैकी २४ नागरिकांचे स्वैब घेतले होते. त्याकरिता पुणे येथील औंध मधील शासकिय रूग्णालयात महिलेच्या कुटुंबातील चार सदस्य व इतर सहा सदस्य असे एकूण दहा सदस्यांना पाठवण्यात आले आहे. त्या दहा पैकी कुटुंबातील चार व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर उर्वरित चौदा व्यक्तींना बारामती मधील सिल्व्हर जुबली रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचे देखील स्वैब घेण्यात आले होते. याचाही अहवाल प्राप्त झाला असून या सर्व चौदा व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता केवळ सहा व्यक्तींचे अहवाल येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे इंदापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा