सरीसृप- नायकुळ / धूळनागीण साप (Banded Racer)

नायकुळं किंवा धूळनागीण हा दुर्मिळ असा बिनविषारी साप आहे. या सापाला इंग्लिश मध्ये Banded Racer असे म्हणतात. याला दक्षिण कोकणात नायकुळ, विदर्भात धूळनागीण, मराठवाड्यात गव्हाळ्या, गोव्यात नागिन तर गडचिरोलीत ताडजेरी अशा विविध नावांनी ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रात क्वचित आढळणारा धूळनागीण हा बिनविषारी साप विशेषतः मध्य आणि दक्षिण भारतात आढळतो.

धूळनागीण सापाची सरासरी लांबी सात फुटापर्यंत असते. रंग फिकट किंवा गडद तपकिरी, गव्हाळी. शरीर लांब, डोके निमुळते टोकदार, शेपूूटही लांब व निमुळती असते. दिसण्यात नाग सापाशी साधर्म्य असल्यामुळे याला धूळनागिण म्हटले जाते. या सापाला तोंडा पासूून शेपटी पर्यंत लांब पट्टे असतात त्याला पट्टेरी धूळनागिण म्हटले जाते. या सापाची मादी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अंडी घालतेे. पिल्लांच्या अंगावर ठराविक अंतरावर पांढरे पट्टे असतात, नंतर ते जातात.

धूळनागीणचे प्रमुख खाद्य उंदीर असल्या मुळे, धामण सापाप्रमाणे हा साप सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांचा रक्षणकर्ता म्हणायला हवा. हा साप भक्ष पकडल्यानंतर गिळण्यापूर्वी त्याला आवळून मारतो. याचे वास्तव्य गवतात, झुडूपात, उंदरांच्या बिळात किंवा दगडांमध्ये असते. हा साप दिनचर म्हणजे दिवसा फिरणारा असून डिवचले गेल्यास मानेचा भाग फुगवतो त्यामुळे फणा काढलेल्या नागाप्रमाणे भासतो. नाग समजून माणसाकडून सर्रासपणे नायकुळ म्हणजेच धुळनागिण साप मारले जातात.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा