सरीसृप- वाळा / आंधळा साप (Blind Snake)

40

आंधळा साप म्हणून परिचित असलेला हा साप, महाराष्ट्रात ‘सापसुरळी‘, ‘दानवं’, ‘कणा’ व ‘वाळा’ या नावांनी ओळखला जातो. या सापाचे डोळे लहान,अस्पष्ट काळ्या ठिपक्याप्रमाणे असतात. ते खवल्यांनी झाकलेले असल्यामुळे त्याला आंधळा साप असे म्हणतात. त्याचे डोळे प्रतिमा तयार करू शकत नाहीत, परंतु प्रकाशाची तीव्रता नोंदविण्यास ते सक्षम असतात. हा अतिशय निरुपद्रवी व गांडूळा सारखा छोट्या आकाराचा, बिनविषारी साप आहे.

हा साप जमिनीखाली बीळ करून किंवा मुंग्या आणि वाळवी यांच्या वारुळामध्ये राहतो. पाणथळ किंवा ओलसर जागी, कुजलेला पालापाचोळा इत्यादी ठिकाणी तो सहजरित्या आढळतो. तसेच पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीवर तो अधिक संख्येने आढळून येतो. ओल्या जमिनीतील मुंग्या, वाळवी, किटकांची अंडी, अळ्या, किडे हे याचे खाद्य आहे. कधी कधी तो वाळवीच्या शोधात उंच झाडांवरही हा आढळतो.

हा साप सरीसृप (Reptilia) वर्गाच्या स्क्वामाटा (Squamata) गणातील टिफ्लोपिडी (Typhlopidae) या सर्पकुलातील आहे. या सापाच्या सुमारे २४० जाती आहेत. उष्ण प्रदेशांत हा सर्वत्र आढळतो. याचे शास्त्रीय नाव इंडोटिफ्लॉप्स ब्रॅमिनस  (Indotyphlops braminus) असे आहे.भारतात टिफ्लॉप्स डायार्डी  (Typhlops diardii) आणि ऱ्हायनोटिफ्लॉप्स अ‍ॅक्युटस  (Rhinotyphlops acutus) या दोन जाती आढळतात. यातील ऱ्हायनोटिफ्लॉप्स अ‍ॅक्युटस  ही सर्वांत मोठ्या आकाराची जाती असून याची लांबी दोन फुटापर्यंत असते.

वाळा सापाचे शरीर लंबगोलाकार असून लांबी वीस सें.मी. पर्यंत व शेपूट टोकदार असते. तपकिरी, काळपट तपकिरी, निळसर राखाडी अशा विविध रंगांमध्ये तो आढळतो. शरीराची वरची बाजू गडद, तर खालची बाजू फिकट रंगाची असते. शरीर गुळगुळीत व त्यावर चकचकीत खवले असल्यामुळे मऊ ओलसर मातीत त्याला त्वरेने घुसता येते. खालील बाजूचे खवले लहान असल्याने त्याला सपाट जमिनीवर चालता येत नाही. तो जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना दिसतो. त्याची गती मंद असते. परंतु डीवचल्यास तो जास्त वेगाने वळवळतो. खूपदा तो गांडुळासारखा दिसतो, मात्र त्याच्या अंगावर वलये नसतात. या सापाची मादी एका वेळी तांदळाच्या आकाराची ७-८ अंडी घालते. वाळा सापांचा आयु:काल आणि प्रसार हा जमिनीची आर्द्रता आणि तापमान यांवर अवलंबून असतो. इतर अनेक सापांचे वाळा साप हे खाद्य आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा