सर्व सापांमध्ये महाकाय असणारा ॲनाकोंडा हा मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप आहे. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने याला पाण-अजगर असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ‘युनेक्टस म्युरिनस’ आहे.
ॲनाकोंडाची लांबी सर्वसाधारणपणे पंधरा ते तीस फूट आणि वजन अडीचशे किलोपर्यंत किंवा थोडे जास्तपण असते. रंग तपकिरी, पिवळा किंवा हिरवा असून पाठीवर मोठे, काळे व अंडाकृती ठिपके असतात. पोटाकडच्या पांढुरक्या भागावर लहान काळी वलये असतात. डोके लांबट, चपटे आणि मानेपासून स्पष्टपणे वेगळे दिसते. याचे भक्ष्य लहान सरपटणारे प्राणी, केमन मगरी, कॅपेबारा नावाचे प्राणी, मासे, पक्षी आणि लहान सस्तन प्राणी आहेत. तो भक्ष्याभोवती आपल्या शरीराची घट्ट वेटोळी करून त्याला गुदमरून मारतो आणि नंतर गिळतो. शत्रूपासून बचाव करताना तो निसटून जाण्याचा प्रयत्न करतो, निसटणे अशक्य झाल्यास शत्रूचा चावा घेतो. तो विषारी नाही, मात्र त्याच्या चाव्यामुळे खोल जखमा होतात.
ॲनाकोंडाची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते. मादीला दरवर्षी वीस ते तीस पिल्ले होतात. जन्मल्याबरोबर पिले तीन फूट लांब असुन ती लगेच स्वतंत्रपणे राहू लागतात. ॲनाकोंडाची लांबी, त्याचे भक्ष्य आणि माणसांवरील हल्ले यांविषयी अतिरंजित भयानक वर्णने पूर्वीच्या काळी केलेली आहेत. अनेक चित्रपटातून ॲनाकोंडाला खलनायक ठरवलं गेलंय, मात्र सहसा तो माणसावर हल्ला करीत नाही. अधिवासावरच्या अतिक्रमणामुळे तसेच शिकारीमुळे मोठे ॲनाकोंडा आता खुप दुर्मिळ झाले असुन यांना वाचवण्यासाठी त्या भागात बरेच निर्बंध घालुन, कडक कायदे केले गेले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.