सरीसृप- पाणदिवड/विरोळा (checkered keelback)

4

हा बिनविषारी साप आहे. दिवडाचा समावेश सरीसृप वर्गाच्या कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी या उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव झिनोक्रोपीस पिस्केटर आहे. त्याला पाणदिवड किंवा विरोळा असेही म्हणतात. तो पूर्व अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, चीन, थायलंड, भारत इत्यादि देशांत आढळतो. भारतात तो भातशेती, तलाव, डबके, नद्या, नाले, ओढे, विहिरी अशा पाणथळ जागी किंवा त्यांच्या जवळपास आढळतो. पाऊस पडायला सुरवात झाली आणि सगळीकडे पाणी भरायला लागले की बेडकांवर ताव मारण्यासाठी हे साप उघड्यावर आलेले आपल्याला सहज दिसतात.

पूर्ण वाढलेल्या दिवडाची लांबी पाच ते साडेपाच फुटांपर्यंत असते. हा साप काळसर, हिरवट, पिवळसर रंगाचा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही नक्षी काहीशी बुद्धीबळाच्या पटासारखी दिसते म्हणूनच याचे इंग्रजी नाव “checkered keelback” असे पडले. पोटाकडील भाग पिवळा किंवा पांढरा असतो. डोके त्रिकोणाकृती असून डोळे मोठे असतात. डोळ्यांतील बाहुल्या गोलाकार असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक बारीक रेघ निघून वरच्या जबड्याच्या शेवटापर्यंत गेलेली असते. नाकपुड्या निमुळत्या व वर वळलेल्या असतात. शेपटी लांब असून शरीराच्या लांबीच्या एक-तृतीयांश असते.

दिवड अतिशय चपळ असतो. तो पाण्यात पोहतो. बेडूक आणि मासे यांवर तो आपली उपजीविका करतो. उन्हाळ्यात तो उष्णकालीन सुप्तावस्थेत आणि थंडीत शीतकालीन सुप्तावस्थेत जातो. त्याला डिवचल्यास तो जोरात हल्ला करतो आणि नागासारखे डोके व मान चपटी करून चावण्याचा प्रयत्न करतो. हल्ल्याच्या वेळी तो उग्र वास सोडतो. याचा जबडा मोठा असल्याने चाव्याची जखम मोठी असते.

मादी एका वेळेस २०–४० अंडी घालते. उंदरांची बिळे, वाळवीची वारुळे, विहिरीच्या भिंतीतील भोके, तलावाकाठचे खळगे यांत ती अंडी घालते आणि तीच अंड्यांचे रक्षण करते व उबविते. अंड्यांतून ६०–७० दिवसांनंतर पिले बाहेर पडतात. कातडी वस्तू तयार करण्यासाठी दिवड मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

भारतात अगदी सर्वत्र आणि सहज दिसणाऱ्या सापांपैकी हा एक साप. याचा स्वभाव प्रचंड तापट असतो आणि तो दंश करण्यात पटाईत आहे. याचा दंशसुद्धा जोरदार आणि वेदनादायक असतो. पण हा साप पुर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याच्या चाव्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. हा साप चिडला की डोके वर काढतो आणि मानेकडचा भाग रूंदावतो. यामुळे पटकन याने फणा काढला की काय असे वाटून हा नाग आहे असा समज होतो. या सापाला हाताळले असताना अतिशय घाण वासाचा स्त्राव तो सोडतो. याच्या बद्दल मात्र बरेच गैरसमज आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा