सरीसृप- मांडूळ (Earth Boa/ Red Sand Boa) बिनविषारी

दुतोंड्या साप या नावाने सर्वपरिचित असलेला एक बिनविषारी साप म्हणजे मांडूळ. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. हा बिनविषारी आणि निरुपद्रवी साप असून मंद गतीने सरपटत पुढे सरकतो. तो स्वत:भोवती वेटोळे घालून डोके जमिनीत खुपसून शेपूट वर ठेवतो व शेपटीची हालचाल करतो, त्यामुळे शत्रू किंवा माणसाला ती शेपटी त्याच्या डोक्याप्रमाणे भासते आणि हा साप आक्रमक झाल्यासारखा वाटतो.

मांडूळ सापाचा समावेश सरीसृप वर्गाच्या बोइडी कुलातील एरिक्स उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिक्स जॉनाय आहे. अजगर व डुरक्या घोणस अशा बिनविषारी सापांचा समावेश बोइडी कुलात होतो. भारतात मांडूळ सर्वत्र आढळतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तो सर्वत्र आढळतो. मांडूळ बोआ कॉन्स्ट्रिक्टर या प्रवर्गातील असून, या प्रवर्गातील साप आपल्या भक्ष्याला पकडून, त्या भोवती वेटोळ्याने आवळुन मारतात आणि नंतर त्याला गिळतात.

अजगरासारखे जाड मांडुळाचे शरीर असून पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची लांबी चार फुटापर्यंत असते. शरीराच्या वरच्या भागाचा रंग चमकदार गर्द तपकिरी किंवा काळसर असतो. पाठीवर पिवळसर रंगाचे पुसट ठिपके किंवा पट्टे असतात. काही मांडुळांवर ठिपके किंवा पट्टे नसतात. या सापाची शेपटी बोथट, जाड व आखूड असते. मांडुळाची शेपटी आणि डोके प्रथमदर्शनी सारखेच दिसतात. त्यामुळे त्याला दोन तोंडे आहेत असे भासत असल्याने त्याचे नाव दुतोंड्या साप पडले आहे. त्याच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीवरील आणि पोटाकडील खवले लहान व एकसारखे असून त्यांच्या कडा षट्‍कोनी असतात. डोक्यावरील खवले मात्र किंचित मोठे असतात. डोळे बारीक असून बाहुल्या उभ्या असतात. मादी ही नरापेक्षा लांब असते.

मांडूळ साप प्रामुख्याने शेतातील मऊ, भुसभुशीत व वालुकामिश्रित मातीमध्ये किंवा बिळात राहतो. उंदीर, घुशी या प्रमुख खादयासोबतच सरडे, घोरपडी, खारी यांसारखे प्राणीही त्याचे भक्ष्य आहेत. भक्ष्याभोवती घट्ट विळखे घालून, दाब देऊन त्याला मारून अखंड गिळतो. हिवाळ्यात मांडुळाच्या नर-मादीचे मीलन होते. मादी चार ते अठरा पिलांना जन्म देते. पिले तपकिरी रंगाची असून त्यांच्या पाठीवर आणि शेपटीकडे आडवे काळे पट्टे असतात. पिले जसजशी मोठी होतात, तसतसे हे पट्टे हळूहळू नाहीसे होतात. नंतर त्यांच्या पाठीचा रंग काळा होतो.

मांडूळ हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. तो उंदीर, घुशी इत्यादी खातो आणि त्यांची संख्या कमी करून शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत करतो. या सापाविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे त्यांची अकारण हत्या केली जाते. त्यांची मोठया प्रमाणात देश विदेशात तस्करी चालते, त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. १९७२ सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मांडुळाला भारतात संरक्षण देण्यात आले आहे. जनजागृती द्वारे आपण अत्यंत निरुपद्रवी,सुंदर आणि शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या अशा मांडूळ सापाला जीवदान नक्कीच देऊ शकतो.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा